मतदानाच्या दिवशी राज्य शासनाकडून सुट्टी जाहीर
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात विधानसभेच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदानाची सुट्टी असणार आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.
राज्यातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा,यासाठी शासनाने सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. शासन परिपत्रकानुसार,राज्यातील विविध मतदारसंघातील व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम आणि इतर कोणत्याही आस्थापनेत कार्यरत असणाऱ्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार आहे. यानुसार,उद्योग विभागात येणाऱ्या उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या आणि संस्था किंवा इतर आस्थापनांना हे शासन परिपत्रक लागू राहील. या दिवशी सुट्टी मंजूर झाल्याने या व्यक्तीच्या पगारात कोणतीही कपात केली जाणार नाही. तसेच पूर्णदिवस सुट्टी देता येणे शक्य नसल्यास अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्याचे सरकारने आस्थापनांना आवाहन केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून २९ ऑक्टबरला नामांकन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जाची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.