स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका चार महिन्यांच्या आत घ्या – सर्वोच्च न्यायालय

ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे 2021 पासून रखडलेल्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आता लवकरच होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घेण्याचे महत्त्वाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज एका प्रकरणात सुनावणी करताना दिले आहेत. कोर्टाने ही निवडणूक 1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार घेण्याचे आदेश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाला यासंबंधी 4 आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचेही निर्देशही देण्यात आले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांना अनिश्चित काळासाठी वाऱ्यावर सोडता येणार नाही. वेळेवर निवडणुका हे तळागाळातील लोकशाहीचे सार आहे. त्यामुळे जिथे मुदत संपली आहे किवा प्रशासन राज आहे अशा सर्वच महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायती व जिल्हा परिषदांची लवकर निवडणुका घेण्यात याव्यात, असे निरिक्षणही कोर्टाने या प्रकरणी आपल्या आदेशात नोंदवले आहे.
याबाबत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले,
निवडणुका गेले 3-4 वर्षांपासून रखडल्या होत्या आणि यात जवळपास ओबीसीच्या आरक्षणाच्या 34 हजार जागा ज्या आहेत त्या कमी झाल्या होत्या. त्यामुळे ओबीसी समाजावर फार मोठे संकट निर्माण झाले होते. परंतु आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे संकट दूर झाले आहे.