शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार शासनाच्या ताब्यात

मुंबई, दि. ११ :– नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन येथे जाऊन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली. सोमवारी 18 ऑगस्ट 2025 रोजी ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे.
ऐतिहासिक दस्तऐवज असलेली ही तलवार लिलावात निघाल्याची बातमी 28 एप्रिल 2025 रोजी कळाली. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांना ही बातमी कळताच त्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन ही तलवार शासनाला मिळावी, या दृष्टीने नियोजन करण्यात आले. दूतावासाशी संपर्क करुन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री ॲड.शेलार यांनी याबाबतचे नियोजन व संपर्क यंत्रणा उभी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे मंत्री ॲड.शेलार यांनी तातडीने एक मध्यस्थ उभा करुन या लिलावात शासनाने सहभाग घेतला व लिलाव जिंकला.
महाराष्ट्र शासनातर्फे ज्या मध्यस्थीने हा लिलाव जिंकला होता, त्यांना लंडन येथे प्रत्यक्ष भेटून त्याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करुन आज मंत्री ॲड.शेलार यांनी ही तलवार ताब्यात घेतली. अशा प्रकारे परदेशात गेलेली ऐतिहासिक वस्तू लिलावात जिंकून मिळवण्याची ही पहिलीच वेळ असून अनेक पराक्रमांची साक्षीदार असलेली ही ऐतिहासिक तलवार आपल्या ताब्यात घेण्याचे भाग्य मला लाभले. तमाम महाराष्ट्राचा हा एक ऐतहासिक विजय आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
ही तलवार ताब्यात घेतांना लंडन येथील मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी या घटनेचा आनंद जल्लोष करुन साजरा केला. या दौऱ्यात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे उपसंचालक हेमंत दळवी सहभागी झाले आहेत.
दरम्यान, सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुन ही तलवार सोमवारी, 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे दाखल होईल. त्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांच्या उपस्थितीत बाईक रॅली काढून वाजतगाजत ही तलवार दादरच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकदमीमध्ये अणली जाणार आहे. तर याच दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत “गड गर्जना” हा कार्यक्रम होणार आहे.
महाराष्ट्र शासनास मिळालेल्या या यशाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाच्या नावाने एक इतिहास नोंद होईल, असा हा आनंदाचा क्षण आहे, अशी भावना मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी व्यक्त केली.
‘तलवारीचे ऐतिहासिक महत्त्व’
रघुजी भोसले प्रथम (1695 ते 14 फेब्रुवारी 1755) हे नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते. रघुजी भोसले यांचे शौर्य आणि युद्धनीती यावर प्रसन्न होऊन छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही पदवी दिली होती. रघुजी भोसले प्रथम यांनी 1745 आणि 1755 मध्ये बंगालच्या नवाबाविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्व करून मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला.
याचबरोबर रघुजी भोसले यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांदा, छत्तीसगड, संबळपूर याही प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दक्षिण भारतातील कुड्डाप्पाचा नवाब, कर्नूलचा नवाब यांचाही पराभव करून दक्षिण भारतात आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला. अठराव्या शतकातील एक अत्यंत धाडसी मराठा सेनानी म्हणून रघुजी भोसलेंकडे बघितले जाते. नागपूरकर भोसलेंच्या भौगोलिक सीमांमध्ये लोखंड, तांबे यांच्या खाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत्या. यांचा वापर वस्तूंसोबतच शस्त्रे बनवण्यासाठीही केला जात असे. नागपूरकर भोसले घराण्यातील राजशस्त्रे निर्मिती आणि सौंदर्य यांचा अजोड मिलाफ आहे.
लंडन येथे लिलावात निघालेली रघुजी भोसले यांची तलवार ही मराठा शैलीच्या ‘फिरंग’ पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. सरळ, एकधारी पाते आणि सोन्याचे नक्षीकाम केलेली मुल्हेरी घाटाची मूठ ही तलवारीची वैशिष्ट्ये आहेत. तलवारीचे पाते हे युरोपीय बनावटीचे असून पात्याच्या खजान्याजवळ पाते बनवणाऱ्या कंपनीचे नाव आहे. युरोपीय बनावटीची पाती ही मध्ययुगीन भारतातल्या उच्च वर्गांमध्ये प्रसिद्ध होती.
पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग’ हा देवनागरी लेख सोन्याच्या पाण्याने लिहिलेला आहे. पात्यावरील लेख ही तलवार रघुजी भोसले यांच्यासाठी बनवली गेली होती किंवा त्यांच्या वापरातील होती, याकडे निर्देश करतो. तलवारीच्या मुल्हेरी मुठीवर सोन्याच्या पाण्याने कोफ्तगरी नक्षी काढलेली आहे. तलवारीच्या उभट मुसुमेला हिरव्या रंगाचे कापड गुंडाळलेले आहे.
रघुजी भोसले प्रथम यांची ही फिरंग तलवार अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण आहे. बहुतांशी मध्ययुगीन मराठा शस्त्रांची कमी अथवा अजिबात नसलेले नक्षीकाम आणि शस्त्रांवरील निर्माणकर्त्याच्या किंवा वापरकर्त्याच्या नावाचा अभाव ही ठळक वैशिष्ट्ये होती. या दोन्हीसही अपवाद म्हणून रघुजी भोसले यांच्या तलवारीवर नावाचा लेख तसेच नक्षीकाम केलेले आहे. तलवारीचे युरोपीय बनावटीचे पाते अठराव्या शतकातील भारतातील आंतरराष्ट्रीय शस्त्रव्यापाराकडे निर्देश करते.
नागपूरकर भोसलेंची 1817 मध्ये सीताबर्डी येथे ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढाई झाली. या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा विजय झाल्यावर कंपनीने नागपूरकर भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली. यामध्ये अनेक मौल्यवान वस्तू, दागिने तसेच शस्त्रांचाही समावेश होता. नागपूरचे संस्थान खालसा झाल्यावर ईस्ट इंडिया कंपनीला वेळोवेळी नजराणे आणि भेटीही मिळाल्या होत्या. रघुजी भोसलेंची तलवार युद्धानंतरच्या लुटीमध्ये अथवा ब्रिटिशांना दिलेल्या भेटींमध्ये देशाबाहेर गेली असण्याची शक्यता असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.ML/ML/MS