चित्रपट परीक्षण समितीवर विश्वास नाही, इतिहासकारांची नेमणूक करा
कोल्हापूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऐतिहासिक चित्रपटांचं पहिलं स्क्रिनिंग महाराष्ट्रात झालं पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आपण पत्र लिहिणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी आज कोल्हापुरात
आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं.
ऐतिहासिक चित्रपटासाठी इतिहासकारांची समिती नेमण्यात यावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
केंद्रीय चित्रपट परीक्षण समितीवर आमचा विश्वास नाही. यासाठी अशा चित्रपटांचं पहिल्यांदा महाराष्ट्रात स्क्रिनिंग झालं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बेजबाबदार वक्तव्यानं महाराष्ट्राच्या वाहनावर हल्ले झाले.
दोन्ही राज्य आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे त्यांनी सीमावासीयांना न्याय द्यावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
मला कर्नाटक दौऱ्याला कर्नाटक पोलिसांची वाय प्लस सुरक्षा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
हर हर महादेव चित्रपटात स्त्रियांविषयी आक्षेपार्ह पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. इतिहास संशोधकांनी बोलावं. जर माझी भूमिका चुकीची असेल, तुम्ही सांगावं, मी पुन्हा कधीही अशा चित्रपटांवर पत्रकार परिषद घेणार नाही.
बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची लढाई दाखवणं मान्य आहे का? चुकीचा इतिहास दाखवण्यापेक्षा चित्रपट काढूच नका, खरा इतिहास दाखवा, विरोध थांबवतो, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती आज बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत.दौऱ्यापूर्वी त्यांनी हर हर महादेव चित्रपट खासगी वाहिनी वर (झी मराठीवर) दाखवला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट केली.
संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपटाला कडाडून विरोध केला आहे. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, नव्या पिढीचं वाचन कमी झालं आहे. मी अजून चित्रपट पाहिलेला नाही, पण इतिहासकारांनी हा चित्रपट पाहूच नका असं सांगितलं आहे. इतक्या चुकीच्या पद्धतीनं मांडणी करण्यात आली आहे. ऐतिहासिक चित्रपटासाठी इतिहासकारांची नेमणूक आवश्यक आहे.
चित्रपटात पाटील हा बलात्कारी दाखवला हे कुठं लिहिलं आहे? स्त्रियांना सन्मान ही शिवरायांची परंपरा असून यांनी चित्रपटात स्त्रियांचा बाजार मांडला आहे. शिवरायांच्या काळात स्त्रियांचा बाजार भरला होता का? हे इतिहासकारांनी सांगावं. बाजीप्रभूंचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं दाखवला आहे. सिनेमैटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड सुरू आहे.
संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले, बाजीप्रभू शिवरायांना भेटत असताना एकदाच पगडी घातली आहे. बाजीप्रभूंना वाढवतानाही त्यांना कमी करत आहात. हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड झाली आहे.
ML/KA/SL
18 Dec. 2022