पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन
अहमदाबाद, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयामध्ये निधन झाले. 28 डिसेंबर रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर काल रात्री साडेतीन च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी ट्विटरवर आपल्या आईचा फोटो शेअर करत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली.
पंतप्रधान मोदी सकाळी 7.45 वाजता अहमदाबादला पोहोचले. येथून ते थेट गांधीनगरच्या रायसण गावात भाऊ पंकज मोदी यांच्या घरी गेले. मोदी घरी पोहोचताय अंत्ययात्रेला सुरुवात झाली. मोदी स्वत: पार्थिव खांद्यावर घेऊन अंत्ययात्रेत सहभागी झाले. शववाहनातही बसले. सेक्टर-३० येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले,
पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या सर्व नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याची माहिती पीएमओने ट्विट करून दिली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बंगालमधील महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभही केला.
“एक तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विलीन झालं,” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आईच्या मृत्यूबद्दलची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा हातामध्ये दिवा घेऊन असलेला फोटो शेअर करत, “आईमध्ये मी कायमच त्या त्रिमूर्तिचा अनूभव घेतला ज्यात एक तपस्व्याची यात्रा, निष्काम कर्मयोग्याचं प्रतीक आणि मूल्य दिसून आली,” असंही मोदी यांनी लिहिलं आहे.
30 Dec. 2022