आमिर खानच्या मुलाच्या चित्रपटाला हिंदू संघटनांकडून विरोध
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आमिर खानचा मुलगा जुनैद खान बॉलिवूडमधील पदार्पणातच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘महाराज’ चित्रपटातून जुनैद बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट 14 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. विश्व हिंदू परिषदेनं एका निवेदनाद्वारे या चित्रपटाला विरोध केला आहे. हा चित्रपट हिंदूविरोधी असल्याचं निवेदनात म्हटलं आहे.
विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत बजरंग दलानं एका निवेदनात म्हटलं आहे की, “यशराज फिल्म्सचा ‘महाराज’ हा चित्रपट 14 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याचं सोशल मीडियावरून समोर आलं आहे. चित्रपटात मुख्य अभिनेता जुनैद खान आहे आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचं पोस्टर पाहता एका हिंदू धर्मगुरूला खलनायक दाखवण्यात आलं आहे.”
निवेदनात पुढे लिहिले आहे की, “चित्रपटात श्रीकृष्णावरही अशोभनीय कमेंट करण्यात आल्याचं आम्हाला कळलं आहे. चित्रपटाच्या माध्यमातून सनातन आणि हिंदू धर्माला कलंकित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा चित्रपट 140 वर्ष जुन्या न्यायालयीन खटल्यावर आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे, तो काळ ब्रिटिशांचा होता, ज्यांना हिंदू धर्म तोडायचा होता. आज 140 नंतर वर्षानुवर्षे हिंदू धर्माचा अपमान करण्याचा हतबल प्रयत्न केला जात आहे.”
“हिंदूंच्या भावना दुखावण्याच्या उद्देशानं हा चित्रपट बनवण्यात आला असून हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपण विश्व हिंदू परिषद आणि संत समाजाच्या शिष्टमंडळाला याची माहिती द्यावी अशी आमची मागणी आहे. हा चित्रपट दाखवा, त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ”, असं निवेदनात म्हटल आहे.
SL/ML/SL
13 June 2024