या राज्यात हिजाब, नकाब, बुरखाधारींना ज्वेलरी दुकानात प्रवेशबंदी
पाटना, दि. ८ : उत्तर प्रदेशातील झाशी येथे ज्वेलरी दुकानामध्ये झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बिहार ज्वेलर्स असोसिएशनने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व ज्वेलरी दुकानांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या निर्णयानुसार, बिहारमधील कोणत्याही सोन्या-चांदीच्या दुकानात हिजाब, नकाब किंवा बुरखा परिधान करून येणाऱ्या व्यक्तींना थेट प्रवेश देण्यात येणार नाही. ग्राहकांनी चेहरा स्पष्ट दिसेल अशा स्वरूपात दुकानात प्रवेश करावा, अशी सूचना असोसिएशनकडून करण्यात आली आहे. हा निर्णय केवळ सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आला असून, दागिन्यांच्या दुकानांमध्ये वाढत्या चोरी, फसवणूक आणि गुन्हेगारी घटनांचा विचार करून तो लागू करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या नियमांची माहिती सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचावी, यासाठी प्रत्येक ज्वेलरी शॉपच्या बाहेर स्पष्ट सूचना लावण्यात येत आहेत. या सूचनेत “मास्क, बुरखा, नकाब आणि हेल्मेट घालून दुकानात प्रवेश करण्यास मनाई आहे,” असे ठळक अक्षरांत नमूद करण्यात आले आहे. ग्राहकांनी चेहरा पूर्णपणे उघडा ठेवूनच दुकानात प्रवेश करावा, अशी अपेक्षा यामागे असल्याचे सांगण्यात आले आहे.
राजदने या निर्णयावर टीका करत म्हटले आहे की, सुरक्षेच्या नावाखाली विशिष्ट धार्मिक परिधान, विशेषतः हिजाब आणि नकाब, यांना लक्ष्य करणे चुकीचे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक व्यक्तीला धर्म आणि परिधान यावरून भेदभाव न करता समान वागणूक मिळावी, असे ते म्हणाले. त्यांनी हा निर्णय धार्मिक स्वातंत्र्यावर आघात ठरू शकतो, असा इशारा देखील दिला.
दुसरीकडे, भाजपने या टीकेला उत्तर देताना कठोर भूमिका घेतली. त्यांच्या मतानुसार, “हा भारत आहे, इस्लामिक देश नाही. येथे हिजाबचे काय काम आहे?” असे विधान करत त्यांनी या निर्णयाला पूर्णपणे समर्थन दर्शविले. भाजपच्या मते, सार्वजनिक सुरक्षा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दुकानांमध्ये चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक आहे, आणि हे नियम धर्म किंवा जात पात यावर आधारित नाहीत, तर व्यावहारिक सुरक्षेवर आधारित आहेत.
SL/ML/SL