बिबट्याच्या दहशतीमुळे महामार्ग ठप्प
नाशिक, दि. ३ : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची मालिका थांबत नाहीये. गेल्या 5 वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जांभूत आणि पिंपरखेड ही गावे बिबट्याच्या हल्ल्याचे केंद्र बनली असून, केवळ एका महिन्यात पिंपरखेडमध्ये 3 मृत्यू झाले आहेत. 13 वर्षीय रोहन बोंबे या मुलाचा बळी गेल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी थेट पुणे-नाशिक महामार्ग 5 तासांहून अधिक काळ रोखून धरला. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांनी आता वनविभागाला थेट आव्हान दिले आहे. ‘आम्हाला बिबट्याला मारण्याची परवानगी द्या!’ अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत प्रचंड वाढली असून, पिंपरखेड गावातील नागरिकांचा संयम आता संपला आहे. अलीकडेच, पिंपरखेडमध्ये एका महिन्यात 3 नागरिकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, ज्यामुळे परिसरात प्रचंड संताप आहे.
या पार्श्वभूमीवर, संतप्त नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्ग तब्बल 5 तासांहून अधिक काळ रोखून धरला. त्यांनी थेट पालकमंत्री अजित पवार किंवा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांचे म्हणणे ऐकावे अशी मागणी केली आहे.
शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना फोन लावला आणि नागरिकांचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचवले. मात्र, केवळ फोनवरील आश्वासनांनी ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. पालकमंत्री किंवा वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी, या मागणीवर नागरिक ठाम आहेत. परिसरातील आमदारांनीही येथे उपस्थित राहावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
SL/ML/SL