सलग ३ दिवस समुद्राला मोठी भरती, मुंबई मनपाकडून अलर्ट जारी
मुंबई, दि. ४ : मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत मोठ्या भरतीचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. समुद्रात ४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग ३ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. या भरती दरम्यान समुद्रामध्ये ४.५ ते ५.०३ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. . यामध्ये भरतीचा दिनांक व वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्या नजीक जाऊ नये तसेच या अनुषंगाने महापालिकेद्वारे मुंबई पोलिसांद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे येणाऱ्या अनुयायांनीदेखील समुद्रकिनारी योग्य खबरदारी बाळगावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
भरतीचे वेळापत्रक
मुंबईत ४ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजून ५२ मिनिटांनी ४.९६ मीटरच्या, ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी ४.१४ मीटरच्या, ६ डिसेंबरला मध्यरात्री १२ वाजून ३९ मिनिटांनी ५.०३ उंचीच्या तर दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी ४.१७ मीटरच्या आणि ७ डिसेंबरला १ वाजून २७ मिनिटांनी ५.०१ मीटरच्या तर दुपारी १ वाजून १० मिनिटांनी ४.१५ मीटरच्या लाटा उसळतील.
SL/ML/SL