NTA च्या परीक्षा पारदर्शक, सुरळीत पार पडण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन

 NTA च्या परीक्षा पारदर्शक, सुरळीत पार पडण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NEET परीक्षेच्या निकालात झालेल्या गैरप्रकारामुळे देशभरातील विद्यार्थीवर्ग त्रस्त झाला होता. त्यानंतर आता राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे (National Testing Agency – NTA) घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडाव्यात यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील उच्च शिक्षण विभागाने सात तज्ञांचा सहभाग असलेली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. परीक्षा प्रक्रियेच्या यंत्रणेतील आवश्यक सुधारणा, माहितीसाठ्याच्या सुरक्षा विषयक नियम सुधारणा, राष्ट्रीय चाचणी संस्थेची संरचना आणि कामकाज यामुद्यांबाबत शिफारसी करण्याचे काम या समितीकडे सोपवण्यात आले आहे. आदेश जारी झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत समिती आपला अहवाल मंत्रालयाला करेल. ही समिती आपल्या मदतीसाठी इतर कोणत्याही विषयतज्ज्ञाची निवड करू शकणार आहे.

या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष आणि इतर सदस्य पुढीलप्रमाणे असतील.

  1. डॉ. के. राधाकृष्णन, अध्यक्ष

इस्रोचे माजी अध्यक्ष आणि अध्यक्ष, प्रशासक मंडळ, आयआयटी कानपूर.

  1. डॉ. रणदीप गुलेरिया, सदस्य

माजी संचालक, एम्स दिल्ली.

  1. प्रा. बी. जे. राव, सदस्य

कुलगुरू, हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ.

  1. प्रा. राममूर्ती के, सदस्य

प्राध्यापक एमेरिटस, सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग, आयआयटी मद्रास.

  1. पंकज बन्सल, सदस्य

सहसंस्थापक, पीपल्स स्ट्राँग आणि संचालक मंडळ सदस्य- कर्मयोगी भारत.

  1. प्रा.आदित्य मित्तल, सदस्य

अधिष्ठाता – विद्यार्थी व्यवहार, आयआयटी दिल्ली

  1. गोविंद जयस्वाल, सदस्य सचिव

सहसचिव, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार

ही समिती या विषयांवर विचारमंथन करेल ;

(i) परीक्षा प्रक्रियेच्या यंत्रणेत सुधारणा

(अ) संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे विश्लेषण करणे आणि यंत्रणेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी तसेच संभाव्य उल्लंघन टाळण्यासाठी उपाय सुचवणे.

(ब) राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या मानक कार्यपद्धतीचा (एसओपी) / नियमाधारीत व्यवस्थेचा सखोल आढावा घेणे आणि प्रत्येक टप्प्यावर त्याचे अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी देखरेख यंत्रणेसह या प्रक्रिया / नियमाधारीत व्यवस्था बळकट करण्यासाठी उपाय सुचविणे.

(ii) माहितीसाठ्याच्या सुरक्षाविषयक नियमाधारीत व्यवस्थेत सुधारणा

(अ) राष्ट्रीय चाचणी संस्थेची विद्यमान माहितीसाठी सुरक्षा प्रक्रिया आणि नियमाधारीत व्यवस्थेचे मूल्यमापन करणे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी उपाय सुचवणे.

(ब) विविध परीक्षांसाठीच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यासंबंधीच्या तसेच इतर प्रक्रियांशी संबंधित विद्यमान सुरक्षा विषयक नियमाधारीत व्यवस्थेची तपासणी करणे तसेच या संपूर्ण व्यवस्थेच्या ठोस बळकटीकरणासाठी उपाय सुचवणे

(iii) राष्ट्रीय चाचणी संस्थेची संरचना आणि कार्यपद्धती

(अ) मुद्दा (i) आणि (ii) अंतर्गत दिलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेची संस्थात्मक रचना आणि कार्यपद्धती कशी असावी याबाबत शिफारशी करणे आणि प्रत्येक स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिका तसेच जबाबदाऱ्या सुस्पष्टपणे निश्चित करणे.

(ब) राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या सध्याच्या तक्रार निवारण यंत्रणेचे मूल्यमापन करणे, यात सुधारणांना वाव असलेली क्षेत्रे निश्चित करणे तसेच या व्यवस्थेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी शिफारशी करणे.

SL/ML/SL

22 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *