किशोरी पेडणेकरांना उच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई दि.18(एम एमसी न्यूज नेटवर्क) : कथित शवपेटी घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या काळात, कोरोना काळात शवपेटी घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. किशोरी पेडणेकर महापौर असताना 16 मे ते 7 जून 2020 या कालावधीत 1200 शवपेटी खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यासाठी प्रत्येक पेटीमागे 6,719 रुपये मोजण्यात आले होते आणि त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर या प्रकरणाची ईडीने चौकशी सुरू केली. किशोरी पेडणेकरांनाही ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. ईडीच्या चौकशीनंतर किशोरी पेडणेकरांवर अटकेची टांगती तलवार होती.
ही अटक टाळण्यासाठी या आधी किशोरी पेडणेकरांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता, पण सत्र न्यायालयाने तो फेटाळला. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला पेडणेकरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायमूर्ती नितीन जमादार यांनी ही याचिका निकाली काढताना किशोरी पेडणेकरांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहे.आज उच्च न्यायालयाने शवपेटी प्रकरणात किशोरी पेडणेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
SW/ML/SL
18 April 2024