आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर उच्च न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह

 आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर उच्च न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलापूरातील शाळेत बालिकांवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुरु झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सरकारवर आणि पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढत एन्काउंटर प्रकरणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एन्काउंटरचा संपूर्ण घटनाक्रमच संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एवढंच नव्हे तर हे एन्काउंटर असूच शकत नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आता पुढची सुनावणी ३ ऑक्टोबर होणार आहे. या सुनावणीत जखमी पोलिसाचे वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आदी पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी आज न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

न्यायमूर्तींनी पोलिसांना अनेक प्रश्न विचारले आहेत. तसंच, अक्षय शिंदेला तुरुंगातून बाहेर काढल्यानंतर त्याला पोलीस व्हॅनमध्ये बसवेपर्यंत आणि एन्काऊंटर झाल्यानंतर शिवाजी रुग्णालयात नेईपर्यंतच्या सर्व घटनाक्रमाचे व्हिडीओ फुटेज उच्च न्यायालयाने सदर करण्यास सांगितले आहेत.

अक्षय शिंदे याने पोलीस वाहनात पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवर गोळीबार केला, असा दावा पोलिसांकडून करण्यात येतोय. याबाबत न्यायमूर्तींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पोलिसांची पिस्तुल अक्षयने कशी हिसकावली. ती आधीच लोड कशी काय होती? यावर आमचा विश्वास बसत नाही. कोणताही सामान्य माणूस पिस्तुल हिसकावून गोळी झाडू शकत नाही. कोणताही कमजोर माणूस पिस्तुल लोड करू शकत नाही. तुम्हाला पिस्तुल वापरता येते का? मी १०० वेळा तरी वापरली आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो”, अशा शब्दात न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारी वकिलांना आणि पोलिसांना खडसावले आहे.

याप्रकरणातील जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे वैद्यकीय अहवालही कोर्टाने मागितले आहेत. तसंच, अक्षयने विशिष्ट अतंराने गोळीबार केला की पाँइट ब्लँक रेंज गोळीबार केला याचा फॉरेन्सिक अहवालही कोर्टाने मागवला आहे. तसंच, एका बाजूला गोळी लागून ती दुसऱ्या बाजूला कुठे गेली असा सवालही त्यांनी विचारला. तसंच, पोलिसांचं वाहन चालवलेल्या ड्रायव्हर, माजी अधिकारी यांचीही चौकशी करण्याचे आणि कॉले डेटा रेकॉर्ड्स तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्याने यापूर्वी कधी शस्त्र वापरली आहेत का? जर त्याने पिस्तुल लोड केली असं तुम्ही म्हणत असाल तर त्याने याआधी शस्त्र वापरली असतील, असंही न्यायमूर्तींनी विचारलं. त्यावर सरकारी वकील म्हणाले, त्याने पिस्तुल लोड केली नाही. झटापटीत पिस्तुल लोड झाली होती. त्याने याआधी कधीही शस्त्रे वापरली नाहीत. याप्रकरणी पुढच्या गुरुवारी (३ ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे.

SL/ML/SL

25 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *