चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा बंद

डेहराडून, दि. १० : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाच्या स्थितीमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून चारधाम यात्रेदरम्यान हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी सुरू राहील. ज्या प्रवाशांसाठी हेलिकॉप्टर बुकिंग करण्यात आले होते. त्या रद्दही केल्या जात आहेत.
यूपीसीए (उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरण) नुसार, चार धाम यात्रा हेलिकॉप्टर सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आली आहे. हेलिकॉप्टर सेवा फक्त चार धाम यात्रा स्थळांवरून यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी उपलब्ध आहे.
केदारनाथ धामसाठी गुप्त काशी, सिरसी आणि फाटा येथील जाण्यासाठी भाविकांना हेलिकॉप्टर सेवा दिली जाते. परंतु, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता, सध्या हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आली आहे.
युद्धस्थितीमुळे यावर्षी चार धाम यात्रेतील यात्रेकरूंची संख्याही बरीच कमी झाली आहे. पर्यटकांनी यमुनोत्री, गंगोत्री आणि बद्रीनाथ-केदारनाथ मंदिरांच्या मुख्य थांब्यांवरील हॉटेल्सचे आगाऊ बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. प्रवासाच्या ठिकाणी असलेल्या अनेक हॉटेल्समध्ये मे आणि जून महिन्यांचे बुकिंग रद्द केले जात आहे, ज्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.