अवकाळीसाठी हेक्टरी 25 हजार रूपये तातडीने मदत द्या

 अवकाळीसाठी हेक्टरी 25 हजार रूपये तातडीने मदत द्या

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे दुष्काळाचे संकट असताना आता अवकाळी पावसामुळे दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. त्यामुळे सरकारने अधिवेशनाची वाट न पाहता शेतकऱ्यांना तातडीने मदत केली पाहिजे. त्यामुळे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रूपयांची मदत देण्यात यावी, वाढीव दुष्काळी 1 हजार 21 महसूली मंडळातील शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.

विधानभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले, अवकाळीमुळे भाजीपाला, फळबागा, केळी, पपई,मका, कांदा, सीताफळ, पेरू, मोसंबी, रब्बी ज्वारी, द्राक्ष, कापूस, धानाचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत. सरकारने दुष्काळ जाहीर करताना दिरंगाई केली होती. तशी दिरंगाई मदत करताना करू नये.केंद्राकडून 2500 कोटींची मदत घेऊन शेतकऱ्यांना देऊ अशी दिशाभूल सध्या सरकारकडून केली जात आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वाली कोण, असा प्रश्न आहे.

ठेके, कंत्राट वाटप करण्याचे बंद करून शेतकऱ्यांना मदत वाटण्याचे काम सरकारने केले पाहिजे. शेतकरी अवयव विकायला निघाले इतकी गंभीर परिस्थिती सरकारने शेतकऱ्यांवर आणली. सध्या राज्यात टँकर सुरू झाले आहेत. नोव्हेंबर महिन्यात अशी परिस्थिती कधी नव्हती.

सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. सरकारच्या उपाययोजना कमी पडत असल्याने अशी परिस्थिती असल्याची टिका वडेट्टीवार यांनी केली. पिक विमा कंपन्यांना 7000 कोटी दिले. या विमा कंपन्या 1800 कोटी मदत देणार असल्याचे कृषी मंत्री सांगत आहेत. मग यातले उरलेले पैसे कोणाच्या खिशात जाणार. या विमा कंपन्यांची मुजोरी सरकारमुळे वाढली. दोन रूपये विमा शेतकऱ्यांना दिला जातोय. तरी सरकार गप्प आहे.

राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. हजारो कोटींच्या वस्तू घेऊन वापराविना आहेत. औषधांचा तुटवडा आहे. रूग्णांच्या जिवाशी खेळण्याचे पाप केले जात आहे. फायली अडवा आणि फायली जिरवा या खेळात सरकार दंग असून हे सरकार बदलल्या शिवाय शेतकरी सुखी होणार नसल्याची भावना आता राज्यात असल्याचेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

ML/KA/PGB 28 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *