मुसळधार अवकाळी पावसाने विदर्भ, मराठवाड्यात शेतीचे मोठे नुकसान
मुंबई, दि. 23 : दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील फेब्रुवारी महिन्यातील अवकाळा पावसाने राज्याच्या विविध भागांमध्ये हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातल्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. लातूरमध्ये विजेच्या कडकडाटासह गारपिटही झाली. बीडमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागाने 23 आणि 24 फेब्रुवारी या दोन दिवसात विजेच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यातल्या नऊ ते दहा जिल्ह्यांत अवकाळी पाऊस झालाय. पावसामुळं नगदी आणि रब्बी पिकांना फटका बसला आहे. यवतमाळमध्ये वीज कोसळून पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. हिमायतनगर तालुक्यासह परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. या पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं…. रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांचं नुकसान झाल असून तत्काळ पंचनामे करुन मदत देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.
गोंदियात आज सकाळपासून अवकाळी पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटसह काही भागात हलक्या तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सालेकसा तालुक्यात सह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रब्बी हंगामातील धान पिकाला पावसामुळे फायदा होऊ शकतो.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी अवकाळी पाऊस झाला होता. रत्नागिरीच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे येथील आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे. कालचा सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे मोहोर आणि ही फळं गळून पडली आहेत. अवकाळी पावसामुळे कापणीला आलेलं चना, तुर, मुग, उडीद यासह कडधान्य आणि फुलोऱ्यावर आलेल्या भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर, उन्हाळी भात पिकाला हा पाऊस लाभदायक ठरणारा आहे.
SL/ML/SL