कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला , पूरस्थिती कायम
कोल्हापूर दि २९– जिल्ह्यातील अनेक भागातील रस्त्यांवर पुराचं पाणी जैसे थे असल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेसह करवीर तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयं तसंच शिरोळ तालुक्यातील ०९ शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पंचगंगा नदीची पातळी गेल्या चोवीस तासात केवळ एका फुटानं कमी होऊन ती आज सकाळी सात वाजता ४६.४ फूट होती. धोका पातळी त्रेचाळीस फूट आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप 85 बंधारे पाण्याखाली असून महापुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे एसटीचे ४८ मार्ग बंद करण्यात आले आहेत. पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरणातील विसर्गही कमी झाल्यानं पुराच्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे.
कोल्हापूरकरांच्या नजरा पाणी पातळीकडे असून आतापर्यंत पडझडीत १.३४ कोटींचं नुकसान झाले आहे. हजारो एकर उभे पीक पाण्यात गेलेले आहे. लाखो टनाचे उसाचे नुकसान झालेले आहे. भात शेती, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांचं नुकसान झालं आहे.
सध्या राधानगरीच्या दोन दरवाजांतून विसर्ग सुरू आहे. धरणातील विसर्गही कमी झाल्याने पुराच्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे. कोल्हापूर शहरात घुसलेले पाणीही कमी होऊ लागलं आहे. धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले असून त्यातून प्रतिसेकंद ४ हजार ३५६ घनफूट पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे .
महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने एसटीचे ४८ मार्ग बंद राहिले आहेत. सोमवारसाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ‘ग्रीन’ अलर्ट दिला असून, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा खोऱ्यातील सर्व नद्यांना महापुराने वेढले असताना दर आठवड्याला जिल्ह्यातच असणाऱ्या पालकमंत्र्यांचा अपवाद वगळता राज्यातून कोणी फिरकलेले नाही.
कोल्हापूर जिल्ह्यात ३ सार्वजनिक, तर ४५५ खासगी अशा ४५८ मालमत्तांची पडझड झाली. यामध्ये तब्बल १ कोटी ३४ लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.