वाशीम जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तांडव, नदी नाल्यांना पूर…

वाशीम दि २७ : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सततच्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी-नाल्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढली असून शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेली आहेत.
मंगरूळपीर तालुक्यातील मोहरी गाव परिसरात नाल्याला आलेल्या पुरामुळे गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.
पुलावरून पाणी वाहू लागल्याने काही नागरिक अडकून पडले असून नाल्याकाठच्या शेतजमिनींतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मानोरा तालुक्यातील हिवरा बु परिसरातही मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले आहेत. हिवरा बु ते कोलार रस्त्यावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गावातील नाल्यात आलेल्या पाण्याच्या प्रवाहात गावकऱ्यांच्या चार गाई व दोन बैल वाहून गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान मानोरा तालुक्यातील अरुणावती नदीला मोठा पूर आला असून नदीचा पाणीप्रवाह धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. नदीकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत.
काही ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. वाशीम जवळील वाघोली गावात अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे.जिल्ह्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, कापूस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाढत्या पावसामुळे पुढील परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.