अहमदनगर तालुक्यात जोरदार पाऊस, अनेक ठिकाणचा संपर्क तुटला
अहमदनगर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अहमदनगर तालुक्यातील साकत परिसरात शुक्रवारी सायंकाळी शनिवारी पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे साकत परिसरातील नदी, ओढ्यांनी रौद्र रूप धारण केले. यामुळे अनेक वाड्या आणि वस्त्यांचा संपर्क तुटला होता. तसेच शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. साकत कोल्हेवाडी कडभनवाडी जोडणारा लेंडी नदीवर असलेला पुल आज झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेला. यामुळे लोकांचा संपर्क तुटला होता. सकाळी आठ वाजता काही लोकांना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. तसेच अनेक विद्यार्थ्यांना परत माघारी जावे लागले.
परिसरात जून महिन्यांपासून पाऊस आहे. जून महिन्यामध्ये पेरणी झाली. तेव्हापासून फक्त आठ दिवस पावसाने खंड दिला. परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला यामुळे लेंडी नदीला पूर आल्यामुळे संपर्क तुटला होता. सकाळी पाणी थोडे कमी झाल्याने जेसीबीच्या साहाय्याने लोकांना पाण्याच्या पलीकडे सोडले. यात अनेक दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी आणि विद्यार्थी अडकले होते.
साकत कोल्हेवाडी मार्गावर साकत जवळ पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच वराट वस्ती, कडभनवाडी या ठिकाणचा संपर्क तुटला आहे. लेंडी नदी आणि वांजरा नदीला पुर आल्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला होता. शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
आज पहाटे झालेल्या पावसामुळे नदीला पूर आला होता. यातच कडभनवाडी, कोल्हेवाडी, वराट वस्ती, कवडवाडी परिसरातील नागरिक यांचा संपर्क तुटला. अनेक दुधवाले आणि विद्यार्थी अडकले होते. सकाळी आठ वाजता जेसीबीच्या साहाय्याने दुधवाले आणि काही नागरिकांना नदीच्या दुसऱ्या किनारी सोडले.
ML/ML/SL
17 August 2024