नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस…
नाशिक, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक शहरासह जिल्ह्यात आज दुपारपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू आहे, या मुसळधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. या जोरदार पावसामुळे भूजल पातळीत योग्य प्रकारे वाढ होत असल्याने बळीराजा देखील सुखावला आहे.
दुपारी दोन वाजल्यापासून जिल्ह्यातल्या विविध भागात ढग मोठ्या प्रमाणात दाटून आल्याने अंधारमय वातावरण निर्माण झाले होते, नाशिक शहरात जोरदार पाऊस सुरु झाल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांची एकच धांदल उडाली. नाशिकरोड, जेलरोड, द्वारका, मुंबईनाका, सातपूर, अंबड सह शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या होत्या.
नाशिक जिल्ह्यात धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे भरले आहेत, धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने दारणा धरणातून अधिक प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला असून आत्ता 7 वाजेपासून विसर्ग वाढवण्यात आला आहे.गंगापूर धरणातून 2283 क्युसेस, नांदूरमधमेश्वर धरणातून 7697 क्युसेस, कडवा धरणातून 3392 क्युसेस विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग विसर्ग अधिक वाढवण्यात येणार आहे, त्यामुळे गोदावरी नदीसह इतर नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना देण्यात आले आहेत.
ML/KA/SL
27 Sept. 2023