गुजरातमध्ये 800 निरोगी व्यक्तींची Heart Surgery
अहमदाबाद, दि. 15 : वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकाराच्या घटना देशभर दिसून येत आहेत. गुजरातमधील प्रमुख शहर अहमदाबाद येथे तब्बल ८०० व्यक्तींना कोणताही त्रास नसूनही त्यांची Heart Surgery झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गरज नसताना या लोकांच्या हृदयात स्टेंट टाकले आहेत. गेल्या दीड वर्षात तब्बल 800 शस्त्रक्रियांची नोंद झाली. याच आकड्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला आणि या प्रकरणाचा खुलासा झाला. मीडिया रिपोर्टनुसार आता या रुग्णालयाला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून काढून टाकण्यात आलं आहे, तसंच 6 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. डॉक्टरलाही निलंबित केल्याची माहिती आहे.
जामनगरच्या जेसीसी हार्ट इन्स्टिट्यूटमधील हा प्रकार आहे. इथं दीड वर्षात 800 शस्त्रक्रिया आणि त्याचं एकूण 6 कोटी रुपये बिल झालं. या शस्त्रक्रिया प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत केल्याचं सांगत हे बिल आरोग्य विभागाला पाठवण्यात आलं. पण शस्त्रक्रियेचा आकडा आणि बिल पाहून काहीतरी गडबड असल्याचा संशय आरोग्य विभागाला आला. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला.
प्राथमिक तपासणीत धक्कादायक माहिती उघड झाली. अशा 105 लोकांना स्टेंट बसवलं, जे पूर्णपणे निरोगी होते. डॉ. पार्श्व वोराने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्याचा आरोप आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे पैसे लाटण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. रुग्णालयाच्या इतर संचालक आणि भागीदारांना काही कळू नये म्हणून त्याने आयुष्मान कार्ड लाभार्थ्यांच्या ऑनलाईनसह सर्व प्रवेश प्रक्रियेची माहिती स्वत:कडेच ठेवल्याचा आरोप आहे. औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना रुग्ण पाठवल्याबद्दल 20% कमिशन दिलं जातं, असंही तपासात समोर आलं आहे.