खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली….
बीड, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेल्या वाल्मीक कराडच्या जामीनाला सीआयडीने विरोध केला आहे. कराडला जामीन दिल्यास पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता आहे, असे लेखी म्हणणे सीआयडीने न्यायालयात सादर केले होते. आज २० जानेवारी रोजी केज न्यायालयात जामीनावर सुनावणी होती, यावेळी वाल्मिक कराड वकिलांच्या विनंती अर्जावरून न्यायालयाने आज होणारी सुनावणी पुढे ढकलली आहे. ती सुनावणी २३ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता होणार आहे.
१४ जानेवारीला केज न्यायालयाने कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर १८ जानेवारीला सुनावणी ठेवली होती, मात्र कराडचे वकील अशोक कवडे आजारी असल्याने त्यांनी सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यामुळे वाल्मीकच्या खंडणीच्या गुन्ह्यातील जामीन अर्जावर सुनावणी होत असली, तरी संतोष देशमुख यांचा खून तसेच मकोका प्रकरणात त्याला २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तो सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे. त्याला बीड शहर ठाण्यात ठेवले आहे.
ML/ML/SL
20 Jan. 2025