शिवसेना पक्ष चिन्ह याचिकेवर सुनावणी आता १२ नोव्हेंबरला

नवी दिल्ली, दि. ८ : शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर आता येत्या १२ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत होणार असून त्यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी घ्यावी, अशी विनंती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे यांच्या वतीनं केली. ही विनंती मान्य करून येत्या १२ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्जल भूयान आणि एन. के. सिंह यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली.
शिवसेना पक्षाच्या नेतृत्वात २०२२ मध्ये मोठी फूट पडली आणि त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांनी पक्षातील अनेक आमदारांसह बंड करून स्वतंत्र गट स्थापन केला आणि नंतर भाजपसोबत मिळून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पारंपरिक निवडणूक चिन्ह कोणाच्या गटाला द्यायचे, यावर मोठा वाद निर्माण झाला.
या वादावर निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांनी दावा केला होता. आयोगाने २०२३ मध्ये निर्णय देत एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह दिले. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी तीव्र विरोध केला आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी असा दावा केला की, शिवसेना पक्षाची खरी वैचारिक आणि संघटनात्मक ओळख त्यांच्या गटाशी संबंधित आहे आणि आयोगाचा निर्णय चुकीचा आहे.
SL/ML/SL 8 Oct. 2025