सर्व रेल्वे स्थानकांवर वैद्यकीय व रुग्णवाहिका सुविधा देण्यात यावी

मुंबई, दि. १८ (प्रतिनिधी) – पश्चिम रेल्वेच्या राम मंदिर रेल्वे स्थानकावर गर्भवती महिलेने एका गोंडस नवजात बाळाला जन्म दिला. या घटनेनंतर विकास बेंद्रे याचे सर्वत्र कौतुक होत असले तरी दुसरीकडे मात्र रेल्वेच्या वैद्यकीय सुविधांचे वाभाडे निघत आहेत. एक गरोदर महिलेला रेल्वे स्थानकावरच बाळांतीण व्हावे लागले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात हा प्रकार घडावा यासारखी लाजीवरवाणी घटना नाही, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवरील आपत्कालीन वैद्यकीय कक्ष त्वरीत सुरु करावा, सर्व ठिकाणी रुग्णवाहीका आणि डॉक्टरांची नियुक्ती करावी. अशी मागणी केंद्रीय रेल्वे समिती सदस्य तसेच ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खा. संजय दिना पाटील यांनी केली आहे.
विरारहून मुंबईकडे जाणा-या एका गरोदर महिलेला गोरेगाव नजीक असाह्य प्रसूती वेदना सुरु झाल्या. प्रवाशांनी तातडीने आपात्कालीन साखळी खेचून राम मंदिर रेल्वे स्थानकावर गाडी थांबवली. महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी प्रवाशांनी आपत्कालीन नंबरवर फोन केला. मात्र रुग्णवाहीका येण्यास वेळ लागणार असल्याने सदर महिलेचे तातडीने बाळांतपण करणे गरजेचे होते. प्रसंगावधान पाहून विकास बेंद्रे या तरुणाने डॉक्टर मैत्रीण असलेल्या देविका देशमुखला व्हिडीओ कॉल करुन तिच्या सल्ल्यानुसार प्लॅटफार्मवरच बाळांतपण केले. काही वेळाने रुग्णवाहीका आल्यावर महिलेला आणि तिच्या नवजात बाळकाला रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकारानंतर सर्वत्र विकास बेंद्रे याचे कौतुक करण्यात येत असले तरी दुसरकडे मात्र रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थापनेचे वाभाडे निघत आहेत. मुंबई सारख्या शहरात एका महिलेला प्लॅटफार्मवरच बाळांतीण होण्याची वेळ आली. हि घटना सर्वांसाठी लाजीरवाणी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय १०० स्थानकापैकी केवळ चार स्थानकांवरच आपत्कालीन वैद्यकीय कक्ष कार्यरत आहेत. पश्चिम रेल्वेच्या २९ स्थानकांपैकी केवळ १४ स्थानकांवर हि सुविधा चालू आहे. तर मध्य रेल्वेच्या १०० स्थानकांपैकी केवळ १५ स्थानकांवरच रुग्णवाहिका कार्यरत आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर २४ तास डॉक्टरसह वैद्यकीय कक्ष असणे गरजेचे आहे. मात्र न्यायालयाचा आदेश असतानाही त्याची पूर्ण अंमलबजावणी केलेली नाही. न्यायालयाच्या आदेशाची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी, सर्व रेल्वे स्थानकांवर मग ते मध्य असो वा पश्चिम रेल्वे स्थानक या सर्व ठिकाणी रुग्णवाहिका कार्यरत असणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे वैद्यकीय कक्ष व डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी केंद्रिय रेल्वे समिती सदस्य, तसेच ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे.