तो आला म्हणजे ती आलीच… की ?
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोष्ट तशी छोटीशीच, पण तिच्यामागचे अर्थ बघितले तर अस्वस्थ करणारी, पावलोपावली भेडसावणारी, विचार करायला लावणारी. स्री-पुरुष समानतेचे पाठ शिकणाऱ्या समाजाला सुरुवातीला टोचणारी पण तरी खरी असणारी !
भाग्यश्री- माझी धाकटी बहीण- काल संध्याकाळी घरी आली होती. कॉफी घेत आमच्या गप्पा सुरू होत्या. आमच्या एका मावसबहिणीचं लग्न आहे पुढच्या महिन्यात, नागपूरला. सगळे मिळून एकत्र जायचे बेत अनेक दिवसांपासून शिजत होते, रेल्वेची तिकिटंही बुक करून झाली होती. आहेर, खरेदी, साड्या यावरून सरकत सरकत विषय पत्रिकेपर्यंत आला.
मिळाली का गं?” या माझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून तिने गाल उडवला. काहीतरी बिनसलंय वाटतं… अंदाज घ्यायला मी घोडं दामटलं, “अगं तूच दिलेस ना पत्ते आपल्या दोघींचे? आम्हाला आली, तुम्हाला कशी नाही आली अजून?”
“ए ताई, पत्रिका आलीये गं बाई.” “मग?” मी आणखीनच गोंधळले.
“कोणाच्या नावाने आली आहे?”
“म्हणजे काय? विक्रांतच्या. का?”
“कसली आहेस अगं तू ! तुला काहीच नाही वाटलं?”
मला अजूनही तिच्या मनात नेमकं काय चाललं होतं, याचा अंदाज बांधता येत नव्हता.
शेवटी तीच थेट मुद्द्यावर आली, “ताई, लग्न आपल्या बहिणीचं आहे ना? मग पत्रिकेवर नावं आपल्या नवऱ्यांची का?”
“अरेच्चा ! नवऱ्यांची का म्हणजे? पद्धत आहे ती.”
“पद्धत? कसली पद्धत? आपल्याकडच्याच लग्नात आपल्यालाच ‘आणि परिवार’ असं बोलावणं?” तिच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. मला मात्र त्यात काही फारसं वावगं वाटेना.
“अगं भागू, इतकं काय ते लावून घ्यायचं? आणि खरंतर पत्रिकेवर नाव घरच्या मोठ्यांचंच टाकायला पाहिजे. त्यांना बोलवून परिवार म्हटलं की सगळे आलेच.” माझा समजावणीचा सूर. आपली बहीण स्वतःच्या नावासाठी अशी अडून बसणं मला योग्य वाटत नव्हतं.
“करेक्ट. म्हणूनच मी आमचा पत्ता देताना सासू-सासऱ्यांचं नाव घालून दिला होता. आणि मावशीला तसं सांगितलंही होतं की पत्रिका त्या दोघांच्या नावे पाठव.””मग? त्यांचं नाव न घालता फक्त निखिलच्या नावे आली की काय? हा सगळा बंड्याचा कारभार असणार.” मी एकदाचा निष्कर्ष काढला.
“नाही. सासूबाईंंचं नावच नाहीये. ‘श्रीपाद आणि परिवार’ अन् ‘निखिल आणि परिवार’ अशी आहेत नावं. मला मुळीच आवडला नाहीये हा प्रकार. अगं माझं सोड, मी लहानच आहे घरी. पण आईंचं नाव घालून मान राखायला नको का?”
“भाग्यश्री, अगं यात कसला मानपान? काकांचं नाव आलं म्हणजे काकू आल्याच की. तसंच तुमचं दोघांचं, निखिल आला म्हणजे तू आलीसच. वेगळा उल्लेख कशाला हवा?”यावरच्या तिच्या उत्तराने मात्र मी विचारात पडले.
“ताई, हे इतकं सरळ आहे म्हणतेस ना, मग आता उलटा विचार करून बघ. आपलं नाव घालून ‘आणि परिवार’ म्हटलं तर? ‘ती आली म्हणजे तू आलासच की’, असं सांगू शकशील तू निखिलला? निखिलचं सोड, विक्रांतला तरी सांगशील का, ‘तुझं नाव नसलं म्हणून काय झालं, मी आले म्हणजे तू आलासच’ असं?”
ती काय म्हणत होती ते, आता मला लख्ख समजलं ! मग मी जमतील तेवढ्या सगळ्या पत्रिका आठवून पाहिल्या. प्रत्येक ठिकाणी तेच. लग्न कोणाच्याही बाजूचं असलं तरी पत्रिका नवरोबाच्याच नावाने यायच्या. असंच तर असतं सगळीकडे. इतके दिवस आपल्याला कसं जाणवलं नाही?
“ताई तुला आठवतंय, आपल्या लग्नांमध्ये आईबाबांनी कशा पाठवल्या होत्या पत्रिका?”
“नाही गं. तूच करत होतीस त्यांना मदत.”
“जोडप्यापैकी दोघांचीही नावं घालायची असा कटाक्ष होता त्यांचा. बाबा तर म्हणायचाच, सात पावलं एकत्र चालली की पुढचं जे काही घडेल ते दोघांचं. संसार दोघांचा, घर दोघांचं, दोन्ही बाजूंचे नातेवाईकसुद्धा दोघांचे असतात !”आता मलाही नीट आठवायला लागलं, “बरोबर गं.- चांगलं घडलं तर श्रेय दोघांचं. वाईट घडलं तर जबाबदारीसुद्धा दोघांची- असं म्हणायचा, नाही…?” आम्ही कधी स्पर्धा वगैरे जिंकून आलो नि कोणी बाबाचं एकट्याचं कौतुक केलं की आवर्जून आईचंही कौतुक करायचाच तो. आणि हो, आमची आईही काही कमी नव्हती ! कधी कोणा नातेवाईकांनी “धाकटी म्हणजे तर मुलगाच आहे तुमचा.. छान सांभाळेल तुम्हाला” असा शेरा मारला की आई लगेचच सांगायची, “मुलगा नाही, मुलगीच आहे ती आमची.. आणि मुलगीच असूदेत तिला. अन् सांभाळायचं म्हणाल तर दोघी लेकींच्या जिवावर आम्ही निर्धास्त आहोत.”
खरोखरच दोघांनी आम्हाला अतिशय विचारपूर्वक वाढवलं. शिक्षण, व्यवसाय, लग्न- सगळेच निर्णय स्वतःचे स्वतःला घ्यायला शिकवलं. त्यामुळे आपोआपच जबाबदारी घ्यायला शिकलो आम्ही. आचारविचारांनी स्वतंत्र झालो. तथाकथित स्रीमुक्तीचे वारे वाहण्याच्याही काळात आमच्या मनावर – ‘स्री मुळात बंधनातच नसेल तर मुक्ती कशापासून हवी? उलट स्वातंत्र्य हे व्यक्तीला स्वतःला मनातून वाटलं पाहिजे.’ असंच बिंबवलं गेलं. सरसकट लैंगिक समानता ठसवली जाण्याच्या काळात आम्ही, ‘स्रीपुरुषांमधली विभिन्न वैशिष्ट्यं जपणारी समानता’ शिकलो. मुलीचं रूपांतर बायको, सून आणि गृहिणीत होण्यापूर्वी ते विचारशील व्यक्तीत झालं पाहिजे, हे शिकलो. आठ मार्चचा महिलादिन एकदाही साजराबिजरा न करता स्री म्हणून स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शिकलो.
मला बराच वेळ गप्प बघून भाग्यश्री म्हणली, “पटलं ना? मला खात्री होतीच… पण अगं घरोघरी आपल्या इतक्या पिढ्या घरातल्या बाईला गृहीत धरण्यात गेल्या आहेत, की आता आपल्याला ते जाणवतही नाहीये. बघ, म्हणशील तर क्षुल्लक गोष्ट आहे, म्हणशील तर थेट विचारसरणीशी जोडलेली आहे.”
मी अजूनही विचारातच होते. मला किंचित हसू आलं.
“का गं? हसायला काय झालं?”
म्हटलं, “काही नाही, गंमत वाटली. बघ ना, लग्नात वधू आपला पूर्ण हात- अंगठाही बाहेर न ठेवता- वराच्या हातात देते. म्हणजे त्याच्याकडे सगळं सोपवूनच टाकते म्हणेनास ! पण, एका अर्थाने परिस्थितीवर स्वतः पकड घेण्याची आपली शक्यता ती बंदच करते की गं…”
भागूचा यावर जास्त विचार करून झाला असावा. चटकन म्हणली, “नाही गं ताई.. तसा हात धरणं ही दोघांच्या १००% कमिटमेंटची खूण नसते का?.. आणि विधींचा भाग राहूदे, दुर्दैवाने कोणी फारसा विचार करत नाही त्यावर.. शिवाय प्रत्येक समाजानुसार त्यात फरक असतात ते वेगळेच. पण प्रत्यक्ष जगताना दोघांनी एकमेकांच्या स्वतंत्र अस्तित्वांचं भान ठेवलं नाही, तर घडी विसकटत जाते, बरोबर ? आणि उलट, हे भान सांभाळत चालल्याने तोलही सांभाळला जातो आपोआपच.”
भाग्यश्रीच्या बोलण्यात तथ्य होतं. एका अर्थाने, नावावरून सुरू झालेलं तिचं हे बोलणं, खरंतर आणखी व्यापक होतं. ती नावाबद्दल आग्रही असली तरी त्यात वस्तू किंवा वास्तूच्या मालकीच्या दृष्टीने नावाचं महत्त्व अपेक्षित नव्हतंच कुठे ! त्यात अपेक्षित होता तो अस्तित्वाचा आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा मान ! आणखी विचार केल्यावर अशी आणखी उदाहरणं सापडली, म्हटलं तर क्षुल्लक, म्हटलं तर पुरुषप्रधानतेचा पगडा दाखवणारी. भाषेत तर कित्येकदा सहजच आपण पुंलिंग वापरत राहतो.
“एखाद्याला वाटेल…” पासून अध्यक्ष, निवेदक, संचालक अशा पदनामांपर्यंत, सर्वसामान्य शब्द आपण पुंलिंगीच वापरतो.
‘एका अपघातात वडील आणि मुलगा जबर जखमी झाले. आणि “माझ्या पोटच्या मुलाचं operation मी नाही करू शकत” असं विख्यात सर्जनने सांगितलं- तर त्याचा अर्थ काय?’ हा प्रसंग कोडं म्हणून सांगता येतोय, ‘त्या मुलाची आईच विख्यात सर्जन असेल’, असं क्वचितच कोणाच्या लक्षात येतंय, यात आपल्या समाजाच्या मनातला gender imbalance च उघड होतोय, नाही का?
गफलत अशी होतेय की याबद्दलच्या संकल्पना समाजात इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत, की सहजासहजी त्या बदलणं शक्य नाही. शिवाय, जिथे बदलाचा प्रयत्न होईल तिथे विरोधाची किंवा संघर्षाची ठिणगी पडणारच, आणि सरतेशेवटी नव्या-जुन्या विचारांतला, किंवा संतुलित आणि असंतुलित विचारांतला म्हणू हवं तर- त्या दोन विचारांतला संवाद सुरू होण्यापूर्वीच संपून जाणार. मग उपाय कसा काढावा ? कोणत्याही अभिनिवेशाशिवाय यातून मार्ग निघेल ?
अशा प्रकारच्या सामाजिक समस्यांवर शाश्वत उत्तर काढण्यासाठी सर्वसाधारणपणे शिक्षणाचा आधार घ्यावा लागतो. माती ओली असतानाच तिच्या गोळ्याला आकार देता येतो. एकदा ती वाळून पक्की झाली की तिच्या आकारात कोणताही बदल होऊ शकत नाही. म्हणून लहान वयातच या संकल्पना काळजीपूर्वक शिकवल्या जायला हव्यात.
मध्यंतरी एक परदेशी short film बघितली होती.- शाळेत लहान मुलांच्या एका वर्गात प्रत्येक मुलाला आणि मुलीला अग्निशामक जवान, शल्यविशारद आणि युद्धवैमानिक यांची चित्रं काढायला सांगितली जातात. काढलेल्या ६६ चित्रांपैकी ६१ चित्रांत, ही कामं करणाऱ्या व्यक्ती पुरुष दाखवल्या होत्या तर फक्त ५ चित्रं स्रियांची होती. फिल्मचा शेवटचा संदेश फार महत्त्वाचा होता. ‘मुलांच्या ५ ते ७ वर्षे वयाच्या कालावधीत त्यांच्या मनात स्री-पुरुषांविषयीच्या साचेबद्ध कल्पना (gender stereotypes) तयार होत जातात. म्हणून याच वयात स्रीपुरुष लिंगभावातला समतोल साधला पाहिजे.’ सुंदर होती फिल्म. दोन मिनिटात मोठी गोष्ट शिकवून जाणारी ! त्यावरून आठवलं म्हणून, भारतात सुरू झालेला एक समांतर प्रयत्न सांगते. काही वर्षांपूर्वी NCERT अर्थात, ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची’ नवीन अभ्यासक्रमाची पुस्तकं वाचनात आली. या सगळ्या पुस्तकांत कोणतीही संकल्पना समजावून सांगताना पुंलिंगाऐवजी स्रीलिंगी शब्द वापरले होते.
उदाहरणार्थ- ‘the manager talked to the staff and explained her idea (व्यवस्थापिकेने कर्मचाऱ्यांना आपली कल्पना समजावून सांगितली.)’ किंवा ‘She took a loan to start the business (व्यवसाय सुरू करण्यासाठी तिने कर्ज घेतले.)’ अशी अनेक उदाहरणं या पुस्तकांमध्ये पेरली आहेत. हेतू हा, की मुलामुलींची दृष्टी मोकळी आणि व्यापक व्हावी. एका जाहिरातीत ‘गाडी दुरुस्ती करण्यासाठी बराच वेळ लागला’ म्हणून मालक अस्वस्थ असताना, गाडीखालून mechanic मुलगी बाहेर येते, आणि मालकाबरोबर प्रेक्षकही चमकतात. कारण पुन्हा तेच, ‘हे काम स्री करू शकते’ असं वाटलेलंच नसतं कधी. पण एकदा बघितल्यावर तसं वाटू शकणं, हा स्वागतार्ह बदल आहे ! दुसरी एक जाहिरात पाहिली इतक्यातच- ‘ घरातली छोटीमोठी कामं आई मुलीबरोबर मुलालाही शिकवते, करून घेते’- अशी. तिथेही तसाच बदल, आणि विचारपूर्वक बदल घडवण्यासाठी घरापासून सुरुवात !
खरंतर अशा अनेक बारीक गोष्टी आहेत, ज्यांत थोडासा बदल करून आपण विचार मोकळे करू शकतो; कोणताही आक्रस्ताळेपणा न करता पुरुषाबरोबर स्रीच्याही अस्तित्वाचा मान ठेवू शकतो. पत्रिकेवर तिचंही नाव घालणं, मुलीच्या (/मुलाच्या) प्रगतिपुस्तकावर पालक म्हणून बाबाच्याच सहीसाठी अडून न राहणं, औपचारिक पत्राच्या मायन्यात ‘महोदय/महोदया’ असा आवर्जून उल्लेख करणं- अशा कितीतरी गोष्टी सापडतील. सापडतील त्या करत राहाव्यात आणि सुचतील त्या सांगत राहाव्यात ! म्हणजे निदान, सेतू बांधताना अंगावरची वाळू झटकून येण्यासाठी धडपडणाऱ्या खारूताईचं समाधान तरी मिळेल !
JV/ML/PGB
8 March 2024