हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
श्रीलंकेत अनुरा कुमार दिसानायके राष्ट्रपती झाल्यानंतर आता नव्या पंतप्रधानांनीही शपथ घेतली आहे. हरिणी अमरसूर्या यांनी मंगळवारी श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ‘नॅशनल पीपल्स पॉवर’च्या ५४ वर्षीय नेत्या हरिणी अमरसूर्या यांना राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी शपथ दिली. एनपीपी खासदार विजीता हेराथ व लक्ष्मण निपुणाराच्ची यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, हरिणी अमरसूर्या या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांच्याआधी सिरिमावो भंडारनायके व त्यांची मुलगी चंद्रिका भंडारनायके कुमारतुंगा यांनी श्रीलंकेचं पंतप्रधानपद भूषवलं आहे. चंद्रिका कुमारतुंगा यांनी आधी पंतप्रधानपद व नंतर श्रीलंकेचं अध्यक्षपद सांभाळलं आहे.