बुडीत पतसंस्थामधील ठेवीदारांसाठी आता स्वतंत्र निधी….

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील ज्या सहकारी पतसंस्था आणि बँका दिवाळखोरीत जातील आणि ठेवीदारांचे पैसे बुडवतील त्यातील ठेवीदारांना किमान एक लाख रुपये परत करण्यासाठी स्वतंत्र निधी उभारला जात आहे अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केली होती. त्यावर नारायण कूचे , प्रकाश सोळंके, बबनराव लोणीकर आदींनी उप प्रश्न विचारले.
पतसंस्थांच्या गैरकारभारामुळे सामान्य ठेवीदारांचे पैसे बुडतात यामुळे हा स्वतंत्र निधी उभारला जात असून त्यातून ठेवीदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न सहकार विभाग करीत आहे असं मंत्री म्हणाले.
सायन रुग्णालयात नवीन सोयी सुविधा
मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालय अर्थात सायन रुग्णालयात नव्याने इमारती बांधून त्यात वाढीव रुग्ण खाटा, परिचारिका निवास , बाह्य रुग्ण विभाग यासह अनेक सुविधा दिल्या जातील अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली.
याबाबतची लक्षवेधी सूचना कॅप्टन आर सेलवान यांनी उपस्थित केली होती, त्यावर यामिनी जाधव, आदित्य ठाकरे , भारती लव्हेकर , सुनील प्रभू आदींनी उप प्रश्न विचारले. पहिल्या टप्प्यात ६१६ कोटी खर्चून डिसेंबर २०२५ पर्यंत पहिली इमारत उभारली जाईल तर दुसऱ्या टप्प्यात १५०७ कोटी खर्चून दुसरी इमारत उभारली जाणार आहे, दुसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर पहिल्या टप्प्यातील इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे असं मंत्री म्हणाले. नायर रुग्णालयात तातडीने दोन सिटी स्कॅन मशीन खरेदीस मंजुरी देण्यात येईल असं ही ते म्हणाले.Haribhau Bagde
ML/ML/PGB
4 July 2024