गारपिटीचा जालन्यातील गुजरात केशर आंबा बागांना मोठा फटका….

 गारपिटीचा जालन्यातील गुजरात केशर आंबा बागांना मोठा फटका….

जालना दि २१ : गारपिटीचा जालन्यातील गुजरात केशर आंबा बागांना मोठा फटका बसला आहे. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील केशर आंब्याच्या बागांना गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. केशर आंब्याच्या कैऱ्यांना गारांचा मार लागल्याने मोठ्या प्रमाणात कैऱ्या तुटून पडल्या आहेत. त्यामुळे कैऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. काल जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यासह विविध भागांत मुसळधार पावसासह तुफान गारपीट झाली. या गारपिटीचा फटका बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथील आंबा बागांना बसला आहे.

देवपिंपळगाव येथील शेतकरी नानासाहेब जाधव यांनी एक हेक्टर क्षेत्रात सुमारे 400 आंब्याची झाडे लावली होती. या बागेतून त्यांना यंदा साडेतीन ते चार लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. गेल्या वर्षी याच गुजराती केशर आंब्यापासून त्यांना 2 लाख 75 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा त्यांनी या बागेसाठी सुमारे 75 ते 80 हजार रुपये खर्च केले होते. मात्र, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे त्यांच्या आंबा बागेचे मोठे नुकसान झाले असून यंदा त्यांना एकही रुपया उत्पन्न मिळणार नसल्याचे ते सांगतात.

गारांचा मार लागल्याने काही आंबे झाडांवरून खाली पडले, तर काही आंब्यांवर डाग पडून ते खराब झाले आहेत. त्यामुळे हे आंबे विक्रीसाठी अयोग्य ठरले आहेत. शासनाने या नुकसानीचा पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, दुसरे शेतकरी तुकाराम ननावरे यांनी दीड एकर क्षेत्रात सुमारे 400 आंब्याची झाडे लावली आहेत. त्यांच्या बागेलाही या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. त्यांनीही या बागेसाठी सुमारे 70 ते 80 हजार रुपये खर्च केला होता आणि यंदा त्यांना सुमारे 4 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र, अचानक झालेल्या गारपिटीमुळे त्यांच्या आंबा बागेचे मोठे नुकसान झाले असून आता त्यातून कोणतेही उत्पन्न मिळणार नसल्याचे ते सांगतात.

गेल्या वर्षी त्यांना एका एकरातून सुमारे अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदाही बागेत चांगल्या प्रमाणात आंबे आले होते, मात्र गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने ते चिंतेत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ नुकसानीचे पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *