गारपिटीचा द्राक्ष बागांना फटका, बागेत द्राक्षांचा सडा
जालना, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्याचा द्राक्ष हब म्हणून ओळखला जाणाऱ्या कडवंची गावाला तुफान गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. काल झालेल्या गारपिटीमुळे कडवंची गावातील द्राक्ष बागांना चांगलाच तडाखा बसलाय. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय. जालना जिल्हा आधीच दुष्काळाच्या झळा सोसत आहे.
जिल्हाभरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सोबतच जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे , असं असताना दुसरीकडे अचानक झालेल्या गारपीट आणि मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीचा फटका बसल्याने द्राक्ष खाली जमिनीवर गळून पडले आहेत. यंदा हवा तसा पाऊस झालाच नाही, अशा परिस्थितीत शेतकरी राजाने कशी बशी त्यांची द्राक्ष बाग जगवली. आणि शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी घास आलेला असताना निसर्गाने पुन्हा एकदा अवकृपा केलीय. त्यामुळे बळीराजाचे आर्थिक गणित पुन्हा कोलमडले आहे. दरम्यान या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.Hail hit the vineyards, grapes rot in the orchard
ML/ML/PGB
12 Apr 2024