श्री गुरुनानक देव जयंती नांदेड गुरुद्वारात उत्साहात साजरी
नांदेड, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शीख धर्माचे संस्थापक आद्य गुरु श्री गुरुनानक देवजी यांची जयंती गुरुपुरब दिवस म्हणून जगभरात साजरी केली जाते. श्री गुरु नानक देव यांची जयंती प्रकाश पर्व म्हणून साजरी करत. शिखांचे पहिले गुरू श्री गुरू नानक देव यांनी एक ओंकारचा नारा दिला. म्हणजे देव एकच आहे. इक ओंकार हे शीख धर्माच्या मूलभूत तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. जगभरासह नांदेड येथील पवित्र श्री सचखंड हजूर साहिब गुरुद्वारामध्ये श्री गुरुनानक देव यांचा जन्मदिवस गुरुपुरब दिवस म्हणजेच प्रकाश पर्व म्हणून साजरा होता आहे.
यानिमित्त संपूर्ण गुरुद्वारा परिसरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून गुरुद्वाराचा दरबार साहिब फुलांनी सजविण्यात आला आहे. आज सकाळ पासूनच शीख बांधवांसह सर्व नागरिक पवित्र गुरुद्वारा साहिब चे दर्शन करून एकमेकांना प्रकाश पर्व च्या शुभेच्छा देत आहेत. यानिमित्त गुरुद्वारा प्रशासनाने भाविकांसाठी विशेष लंगर चे आयोजन केले असून सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सामाजिक संस्थानी रक्तदान शिबिर आणि विविध उपक्रमाने हा दिवस साजरा करीत आहेत.
श्री गुरु नानक जयंतीचे शिख धर्मीयांसाठी आणि मानवतेला मानणाऱ्या सर्वांसाठीच अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शीख धर्माचे पहिले गुरू श्री गुरू नानक देव यांचे जीवन आणि शिकवण यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. गुरू नानक देव यांनी समानता, प्रेम, सेवा आणि प्रामाणिकपणा या तत्त्वांवर भर दिला. सर्वांप्रती बंधुता आणि सहिष्णुतेची भावना अंगीकारण्याचा मंत्र त्यांनी दिला. श्री गुरू नानक देव यांनी “नाम जपो, किरत करो, वंद छको” म्हणजेच देवाचे नामस्मरण करा, प्रामाणिकपणे काम करा आणि गरजूंना वाटून खा, असा संदेश दिला. हा सण त्यांनी आपल्या जीवनात प्रस्थापित केलेल्या निःस्वार्थ सेवेची आणि मानवतेबद्दलच्या प्रेमाची भावना साजरी करण्याचा उत्सव आहे.
ML/ML/PGB 24 Aug 2024