गुजरात पोलीसांनी ताब्यात घेतले १०२४ बेकायदा वास्तव्यास असणारे बांग्लादेशी

अहमदाबाद, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य पोलिसांना धडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यानंतर आता राज्य पोलीस दर बेकायदा वास्तव्यास असणाऱ्या पाकीस्तानी आणि अन्य देशांतील नागरिकांचा शोध घेत आहेत. गुजरात पोलिसांनी अवैधरित्या राहणाऱ्या १०२४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. ही कारवाई जम्मू-काश्मीरमधील अलीकडील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केली गेली आहे, ज्यामुळे राज्यभरात सुरक्षा यंत्रणा अधिक तीव्र करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान अटक झालेल्या लोकांमध्ये अल-कायदाच्या स्लीपर सेल्सशी संबंधित असण्याचा संशय असलेल्या दोन व्यक्तींचाही समावेश आहे.
ही मोहीम अहमदाबाद आणि सुरत या शहरांमध्ये राबविण्यात आली. अहमदाबादमध्ये ८९० जणांना अटक करण्यात आली, तर सुरतमध्ये १३४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही व्यक्तींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून रहिवासी असल्याचे दाखविले असल्याचा संशयही तपास यंत्रणा करत आहेत.
गुजरातचे गृह राज्यमंत्री यांनी या कारवाईचे वर्णन “ऐतिहासिक विजय” म्हणून केले असून अवैधरित्या राहणाऱ्या व्यक्ती आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी मध्यरात्री झालेल्या या कारवाईला गुजरात पोलिसांसाठी “ऐतिहासिक विजय” म्हटले. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या दहशतवादी हल्ल्याला भारताने पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. परंतु, शनिवारी गुजरातमध्ये ताब्यात घेण्यात आलेले नागरीक बांगलादेशी असल्याचा दावा करण्यात येत आहे. अहमदाबादमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी पहाटे सांगितले की, “आज सकाळी ३ वाजल्यापासून अहमदाबाद गुन्हे शाखेने एसओजी, ईओडब्ल्यू, झोन ६ आणि मुख्यालयातील पथकांसह अहमदाबाद शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी स्थलांतरितांना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन केले. या कारवाईदरम्यान, ४०० हून अधिक संशयास्पद स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आले आहे.” तर, दुपारपर्यंत ही संख्या ८९० पर्यंत पोहोचली. अहमदाबाद शहरातील चांदोला तलाव परिसरातून बहुतेक लोकांना ताब्यात घेण्यात आले.
सध्या अटक केलेल्या व्यक्तींना चौकशीसाठी ठेवण्यात आले असून, या चौकशीतून आणखी महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. ही घटना राज्याच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे
SL/ML/SL
26 April 2025