जीएसटी कमी झाल्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनि काळबादेवीतील व्यापाऱ्यांशी साधला संवाद

मुंबई प्रतिनिधी: केंद्रातील मोदी सरकारने जीएसटीचा स्लॅब कमी केल्याचा सकारात्मक परिणाम देशभरात जाणवू लागला असून महसुलात वाढ होऊन भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
मुंबईत आयोजित जीएसटी बचत उत्सव कार्यक्रमा अंतर्गत त्यांनी मुंबईतील काळबादेवी भागातील व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांना जीएसटी दरात केलेल्या बदलांचे महत्त्व नीट समजावून सांगितले. तसेच या बदलांचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहचवण्याची विनंती त्यांना केली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, “टॅक्स कमी झाल्याने विक्रीत वाढ होते, उत्पादन वाढते आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळते. औषधांवरील जीएसटी पूर्णतः रद्द करण्यात आला आहे. टॅक्स कमी झाला तर महसूल वाढतो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते.”असे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘स्वदेशी भारत’च्या घोषणेला यामुळे बळ मिळाले आहे. संरक्षण क्षेत्रात परदेशी उपकरणांवर अवलंबून राहावे लागणार नाही. स्वदेशी मिसाईल व संरक्षण साहित्य निर्मिती सुलभ होऊन आत्मनिर्भर भारताकडे एक मोठे पाऊल टाकले गेले आहे.
“जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेत मोठी झेप घेतली आहे. भारत आधी 11 व्या स्थानावरून आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. लवकरच भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल,” असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
यानंतर काळबादेवीमधील व्यापाऱ्यांची सगळ्यात जुनी संस्था असलेल्या हिंदुस्थान चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांशी त्यांनी संवाद साधला, घटस्थापनेच्या मुहूर्तावर देशभरात नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लागू करण्यात आले आहेत. यात आता यापुढे दोनच स्लॅब असणार असून आता जीएसटी दरांमध्ये ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच स्लॅब असतील. यामुळे या निर्णयांचा व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून ग्राहकवर्गाला देखील अनेक वस्तू कमी किमतीत देता येणे शक्य होणार आहे.
जीएसटी बचत उत्सव हा फक्त व्यापाऱ्यांसाठी आणि उद्योजकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय आहे. अनेक वस्तूंच्या दरात घट झाल्यामुळे त्यांच्या उत्पादन आणि विक्री खर्चात घट होणार आहे. हा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी दिवाळी निमित्त दिलेली मोठी भेट आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा मोठा निर्णय असून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
राज्य शासन देखील जीएसटीच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचण आल्यास तुम्हाला ती नक्की सोडवेल असे यावेळी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी खासदार मिलिंद देवरा, शिवसेनेच्या सुशिबेन शहा, हिंदुस्थान चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुशील गाडिया, रामकिशोर दरक, महेंद्र जैन, अमृत खेवसारा, अनुराग पोद्दार आणि माजी आमदार राज पुरोहित, शिवसेनेचे राजाराम देशमुख तसेच सर्व व्यापारी बांधव उपस्थित होते.KK/ML/MS