पुण्यातील ४४ पोलीस ठाणे ‘ग्रीन पोलीस स्टेशन’ म्हणून पर्यावरणपूरक बनवणार
पुणे, 23 : पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या एम्प्रेस गार्डनमध्ये यंदाही भव्य पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, पुण्याच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारचा हिरवागार परिसर असणे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. निसर्गसंवर्धन ही केवळ सरकारचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे आणि पोलीस विभाग ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडेल. आज हरित सेनेची गरज आहे, त्यामुळे “खाकीसेना आता हरितसेनेच्या रूपात कार्य करणार” असून शहरातील ४४ पोलीस ठाणे ‘ग्रीन पोलीस स्टेशन’ म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक पोलीस कर्मचारी सहकार्य करेल, असे मत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते आज एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन २०२६ चे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ, पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितले की, पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ एका संस्थेची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाने त्यात योगदान देणे आवश्यक आहे आणि या दिशेने पुणे पोलीस आपली जबाबदारी अत्यंत गांभीर्याने पार पाडेल.KK/ML/MS