सावरकर जयंतीला पर्यटन विभागाच्या पुढाकारातून भव्य पदयात्रा
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक तेजस्वी पर्व, महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनकार्य अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या पुढाकारातून राज्यभरात विविध ठिकाणी ‘वीरभूमी परिक्रमा’अंतर्गत ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’चे आयोजन २१ मे ते २८ मे दरम्यान करण्यात येत आहे.
या सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच स्वा. सावरकरांच्या १४० व्या जयंतीदिनी २८ मे या दिवशी दादर, मुंबई येथे भव्य पदयात्रा व प्रकाशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मुंबई व लगतच्या महानगरांतील हजारो सावरकरप्रेमी राष्ट्रभक्तांची शक्ती दादरमध्ये एकवटणार आहे.
राज्याचा पर्यटन विभाग, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक व विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आदींसह मुंबई व लगतच्या महानगरांतील राष्ट्रीय विचारधारेच्या संस्था-संघटना, सांस्कृतिक-धार्मिक संस्था-संघटना, शैक्षणिक संस्था, नागरिक-कार्यकर्ते यांची उपस्थिती असेल.
या अभिनव उपक्रमामध्ये २८ मेच्या सायंकाळी ६.३० वाजता दादर पश्चिम येथील सावरकर सदन ते स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक अशी भव्य पदयात्रा काढण्यात येईल. त्यानंतर स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याजवळ पदयात्रा येऊन तेथे सावरकरांना मानवंदना देण्यात येईल.
याच ठिकाणी सावरकर लिखित ‘जयोस्तुते’ गीताच्या सामूहिक गायनाने पदयात्रेची सांगता होईल.
या पदयात्रेला यशस्वी करण्याकरिता पर्यटन विभागासह स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, विवेक व्यासपीठ व इतर अनेक राष्ट्रीय विचाराच्या संस्था-संघटनांतर्फे गेले अनेक दिवस मोठ्या प्रमाणात जनसंपर्क सुरू आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार यांसह अनेक ठिकाणांहून मोठ्या संख्येने या पदयात्रेकरिता राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित राहणार आहेत.
दादर पश्चिम येथे बालमोहन विद्यामंदिराजवळ असलेले सावरकर सदन येथे स्वा. सावरकरांचे त्यांच्या अखेरच्या काळात अनेक वर्षे वास्तव्य होते. तसेच, याच ठिकाणी त्यांनी आत्मार्पण केले. त्यामुळे या ऐतिहासिक स्थानाचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्व मोठे आहे. तसेच, स्वा. सावरकरांच्या विचार व जीवनकार्याच्या प्रचार-प्रसारासाठी दादर पश्चिम येथील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक ही संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. त्यामुळे या दोन स्थानांदरम्यानची ही पदयात्रा अनेकार्थाने महत्वाची आहे.
याशिवाय वीरभूमी परिक्रमा व सावरकर विचार जागरण सप्ताहाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाद्वारे प्रथमच स्वा. सावरकरांच्या जीवनकार्याचा इतक्या व्यापक स्तरावर गौरव होत असून याकरिता महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग व विवेक व्यासपीठाने पुढाकार घेतला आहे. यामुळे राज्यातील वातावरण ‘सावरकरमय’ होत असल्याने राज्यातील तमाम सावरकरप्रेमी नागरिक, संस्था-संघटनांमध्ये उत्साहाचे व आनंदाची भावना व्यक्त होत आहे.
अशा या अभिनव व भव्य पदयात्रेस मुंबई व लगतच्या प्रदेशातील अधिकाधिक नागरिक, कार्यकर्ते, युवा, महिला-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहात असून ज्यांना या विषयी माहिती नसेल त्यांनीही या पदयात्रेत उपस्थित राहावे, असे आवाहनही पर्यटन विभाग, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक व विवेक व्यासपीठ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
सावरकर टुरिझम सर्किट
स्वा. सावरकरांचे वास्तव्य लाभलेल्या महाराष्ट्रातील ठिकाणांचे जसे की भगूर [सावरकरांचे जन्मस्थान], नाशिक, पुणे, सांगली, रत्नागिरी व मुंबई येथील ऐतिहासिक स्थळांचा विकास करत ‘स्वा. सावरकर टुरिझम सर्किट’ निर्मितीचा संकल्प राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकताच घोषित केला होता. तसेच, या सर्किटला ‘वीरभूमी परिक्रमा’ असे नावही देण्यात आले होते. यासह सावरकरांच्या जीवनकार्याला अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवण्याकरिता पर्यटन विभाग व विवेक व्यासपीठाच्या माध्यमातून ‘विचार जागरण सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले.
याअंतर्गत २१ मे ते २८ मे दरम्यान येथे उल्लेखलेल्या सर्व ठिकाणी मिळून तब्बल ४० हून अधिक कार्यक्रम संपन्न होत असून त्यांना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. रविवारी २८ मे या दिवशी १४० व्या सावरकर जयंतीच्या निमित्ताने भव्य पदयात्रा सावरकरभक्त काढणार आहेत. राज्याचा पर्यटन विभाग, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक व विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या या दिवशी विविध कार्यक्रम होत आहेत. तसेच २१ ते २८ या दरम्यान चालललेल्या ‘विचार जागरण सप्ताहा’चा समारोपही रविवारी होत आहे.
ML/KA/PGB
25 May 2023