भिवंडीत उभे राहणार शेतमालासाठी भव्य मल्टी प्रॉडक्ट हब
मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र सरकारने कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भिवंडीतील मौजे बापगाव येथे सुमारे ८ हेक्टर शासकीय जमीन पणन विभागाकडे सुपूर्द करण्यात आली असून, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा मल्टी प्रॉडक्ट हब उभारण्यात येणार आहे. या हबमध्ये शेतमालाची साठवणूक, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि थेट विक्रीची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर मिळेल, दलालांची साखळी कमी होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात थेट वाढ होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पामुळे कृषी उत्पादनांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळणार असून, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची संधी मिळेल. अन्नप्रक्रिया उद्योग, साठवणूक, वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे, ज्यामुळे स्थानिक युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. महसूल विभागाने जमिनीच्या वाटपाचा कालावधी ३० वर्षांवरून वाढवून ४९ वर्षे केला आहे, ज्यामुळे दीर्घकालीन पायाभूत प्रकल्पांना स्थिरता मिळणार आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, हा मल्टी प्रॉडक्ट हब शेतकऱ्यांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, महाराष्ट्रातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देईल. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना निर्यातीसाठी नवी बाजारपेठ उपलब्ध होईल आणि जागतिक स्तरावर त्यांचे उत्पादन पोहोचवण्याचा मार्ग मोकळा होईल.
SL/ML/SL