राज्यातील ९५ हजार वाहनांना बसवले GPS ट्रॅकिंग

प्रवाशांच्या, विशेषतः महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत महाराष्ट्रामध्ये आता जवळपास 95 हजार सार्वजनिक वाहनांना GPS ट्रॅकिंग डिव्हाइस बसवण्यात आले आहेत. या डिव्हाइसमुळे रिअल-टाइम मॉनिटरिंग शक्य झाले असून, वाहनात एक SOS अलर्ट बटन देखील आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या (MMVD) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या व्हीकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइसमुळे (VLTDs) मुंबईतील अँधेरी आरटीओमध्ये नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातून वाहनांचे त्वरित लोकेशन शोधता येते.
जर एखाद्या प्रवाशाने वाहनातील लाल रंगाचे पॅनिक बटन दाबले, तर लगेच नियंत्रण कक्षाला वाहनाचे तपशील आणि लोकेशनसह एक अलर्ट पाठवला जातो. हा नियंत्रण कक्ष 24/7 कार्यरत असतो, जिथे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आणि तांत्रिक सहाय्यक टीम कार्यरत आहेत.
अँधेरी आरटीओमधील हा केंद्रीय नियंत्रण कक्ष बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) स्थापन केला असून, त्याला निर्भया फंडमधून अंशतः निधी मिळाला आहे. हा निधी सार्वजनिक ठिकाणी आणि वाहतुकीतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या प्रकल्पांना मदत करतो.