सरकारने स्थापन केला राज्यातील पहिला “AI पॉलिसी टास्कफोर्स”
मुंबई दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या सरकारच्या १०० दिवसीय कृती आराखड्याचा भाग म्हणून, राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण तयार करण्यासाठी “AI पॉलिसी टास्कफोर्स” स्थापनेस मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालया मार्फत तयार करण्यात येणारे “AI पॉलिसी २०२५” राज्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उद्योगांच्या वेगवान वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासंदर्भात “AI पॉलिसी टास्कफोर्स” स्थापनेसंबंधित शासन निर्णय देखील आज जाहीर करण्यात आला आहे.
राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. की, “महाराष्ट्राचे AI धोरण या औद्योगिक विकासाला चालना देईल आणि महाराष्ट्राला येणाऱ्या काही वर्षांत १ ट्रिलियन डॉलर्सची GDP गाठण्याच्या उद्दीष्टाच्या दिशेने पुढे नेईल.
महाराष्ट्राचे AI धोरण, भारत सरकारच्या “IndiaAI Mission Policy” च्या चौकटीवर आधारित असून हे AI धोरण महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी तयार करण्यात आलेले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण आणि योजना तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान संचालनालय, मुंबई संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग, नियोजन विभाग या तिन्ही विभागाचे उप सचिव, एसइएमटी प्रमुख, डॉ. विजय पागे, संचालक ब्रम्हा रिसर्च फाउंडेशन मुंबई, नरेन कचरु, प्रमुख एआय, गुगल इंडिया, रोहित किलम, चीफ टेक्नॉलॉजी ऑफीसर एचडीएफसी लाईफ, भुवन लोढा, सीइओ, एआय डीवहीजन, महिंद्रा ग्रुप, विवेक माथुर, पार्टनर डेलॉईट, अमित दास, सीइओ थिंक ३६० एआय, डॉ. राजन वेळूकर, कुलगुरु ऍटलस स्किलटेक विद्यापीठ, माजी कुलगुरु मुंबई विद्यापीठ, सुनिल गुप्ता, संस्थापक क्युएनयु लॅब, संचालक कॉर्पोरेट नियोजन, माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा कॅबिनेट सचिवालय यांचे प्रतिनिधी, कक्ष अधिकारी(तांत्रिक) या सदस्यांचा समावेश आहे.
ML/ML/SL
17 Jan. 2025