नितीन देसाई यांचा स्टुडिओ सरकार ताब्यात घेईल…

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या कंपनीच्या वसुली आणि व्याज पध्दतीची कसून चौकशी करावी आणि त्यांचा स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा अशी मागणी विधिमंडळात करण्यात आली.
विधानसभेत अशी मागणी आशीष शेलार यांनी केली, याची चौकशी करावी आणि तो स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. असा हरहुन्नरी कलाकार जाणं दुर्दैवी, स्टुडिओ गहाण पडला होता, त्यावर जप्ती आणली गेली मात्र ही संपूर्ण प्रक्रिया तपासली जाईल , नियमबाह्य पद्धतीने व्याज आकारले गेले का , त्यांना त्रास दिला होता का हे सर्व तपासले जाईल. स्टुडिओ ताब्यात घेण्याबाबत विचार केला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
देसाई यांनी अत्यंत कष्टाने उभारलेला एनडी स्टुडिओ कोणाच्याही घशात जाणार नाही , याची काळजी राज्य सरकार घेईल असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असं ते म्हणाले.
नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी सरकारने या सगळ्याच्या मुळाशी जाऊन एडेलवेस फायनान्स कंपनीची चौकशी करावी अशी मागणी भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज विधानपरिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली होती. देसाई यांचं मूळ कर्ज हे व्याज वाढून अडीचशे कोटींपर्यंत कसं काय पोहोचलं त्यांना आर्थिक विवंचनेत कोणी ढकललं याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.
नितीन देसाई यांच्या शेवटच्या कॉल रेकॉर्डिंग मन विषण्ण करणाऱ्या आहेत त्यात त्यांनी सांगितल्या प्रमाणे एनडी स्टुडिओ राज्य सरकारने ताब्यात घेऊन कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य कलामंच उभारावा अशी मागणी दरेकर यांनी केली.
त्याला विरोधी पक्षातील भाई जगताप, सचिन अहिर यांनी अनुमोदन दिलं.
ML/KA/SL
3 Aug 2023