ओला-उबरला टक्कर देण्यासाठी सरकार सुरू करणार सहकारी टॅक्सी सेवा

देशात खासगी टॅक्सी सेवेला केंद्र सरकारकडून लवकरच पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. मोठ्या शहरांमध्ये खासगी टॅक्सी सेवेचा वापर वाढला आहे. मात्र, खासगी टॅक्सी कंपन्यांविरोधात ग्राहकांच्या तक्रारींमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच सहकार टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. इंडियन फेडरेशन ऑफ अॅप बेस्ट ट्रान्सपोर्टने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर सहकार टॅक्सीबाबत टॅक्सीचालकांमध्ये उत्साह असल्याचं पाहायला मिळालं. आपणही नोंदणी करून सहकार टॅक्सी चालवू असं मत टॅक्सी चालकांनी व्यक्त केलं आहे.
घरातून ऑफीस किंवा इतर ठिकाणी प्रवास करायचा असेल तर मोठ्या शहरांमध्ये ओला उबर सारख्या खासगी टॅक्सींचा वापर केला जातो. आता केंद्र सरकारही या खासगी टॅक्सींना टक्कर देणार आहे. देशात खासगी टॅक्सी सेवेला केंद्र सरकारकडून लवकरच पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्र सरकार देशात सहकार टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. सहकार मंत्री अमित शाह यांनी लोकसभेत ही घोषणा केली आहे. याचा कॅबचालकांसह ग्राहकांनाही फायदा होणार आहे. अमित शाह म्हणाले की, आतापर्यंत अशा टॅक्सी सेवांमधून मिळणारे कमिशन श्रीमंत लोकांच्या हातात जायचे आणि ड्रायव्हर बेरोजगार राहायचे. आता हे होणार नाही आणि एक सहकारी क्रांती सुरू होईल.
‘सहकारातून समृद्धीचा नारा हा केवळ एक नारा नाही तर आम्ही तो प्रत्यक्षात अंमलात आणला आहे. काही महिन्यांत सहकारी टॅक्सी सेवा येत आहे. ही सहकारी सेवा चारचाकी वाहने, ऑटो आणि दुचाकी वाहनांची नोंदणी करेल. या सेवेत नोंदणी केल्यानंतर, संपूर्ण फायदा थेट ड्रायव्हरला मिळेल.