नागपूरात शासकीय निवासी डॉक्टर संपावर
नागपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर गेले आहेत. नवीन वसतीगृह बांधून द्या, एक वर्षाच्या शासकीय बाँड बद्दलच्या अटीचा पुनर्विचार करा, वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयात शिक्षकांची भरती करा, निवासी डॉक्टर्सना सातव्या वेतन आयोगाच्या दर्जानुसार विद्या वेतन द्या. अशा अनेक मागण्या पुढे करत आज राज्यभरातील निवासी डॉक्टर्स बेमुदत संपावर गेले आहेत.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्याल आणि रुग्णालयात 585 निवासी डॉक्टर्स संपावर गेल्याने रुग्णसेवा बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज सकाळपासूनच सर्व निवासी डॉक्टर्स रुग्णालयाच्या आत गेले नसून आकस्मिक वैद्यकीय सेवा विभागाच्या समोर घोषणाबाजी करत आंदोलन करत आहेत.
नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 350 निवासी डॉक्टर्स ही संपात उतरले आहे. त्यामुळे नागपुरातील दोन्ही शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णसेवा बाधित होत आहे. जोवर शासन आमच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही तोवर फक्त आकस्मिक सेवा सोडून इतर कुठलीही रुग्णसेवा आम्ही देणार नाही असा निर्धार आंदोलन करणाऱ्या डॉक्टर्स व्यक्त केला आहे.
ML/KA/SL
2 Jan. 2023