सरकारकडून नैसर्गिक वायूच्या दरात ४ टक्के वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या मूल्य निर्धारण दरात (एपीएम) ४ टक्क्याने वाढ केली आहे. नैसर्गिक वायूपासून CNG व PNG तयार होत असल्याने त्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. एक एप्रिलपासून सरकारने नैसर्गिक वायूचे दर ६.५० वरून ६.७५ डॉलर प्रति एमएमबीटीयू वाढवले आहेत. म्हणजेच सरकारने प्रति एमएमबीटीयू दरात ०.२५ टक्क्याने वाढ केली आहे. याबाबतची अधिसूचना पेट्रोलियम खात्यातील पेट्रोलियम प्लॅनिंग आणि ॲॅनालिसिस विभागाने काढली आहे.
हा नैसर्गिक वायू ONGC व ऑइल इंडिया लिमिटेड उत्पादन करतात. या नैसर्गिक वायूचा वापर स्वयंपाकासाठी लागणाऱ्या PNG व वाहन, खत व विजेसाठी लागणाऱ्या CNG निर्मितीसाठी वापरला जातो. दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच नैसर्गिक वायूच्या मूळ दरात वाढ झाली आहे.
सरकारने एप्रिल २०२३ मध्ये नवीन नैसर्गिक वायू मूल्य निर्धारण धोरण तयार केले. यानुसार, कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय दराच्या १० टक्के दर नैसर्गिक वायूचा असेल, असे निर्धारित केले होते.
तेल खात्यातील पेट्रोलियम प्लॅनिंग आणि ॲॅनालिसिस विभागाने सांगितले की, १ ते ३० एप्रिल २०२५ मध्ये नैसर्गिक वायूचा दर ७.२६ डॉलर प्रति एमएमबीटीयू राहील, असे जाहीर केले. मात्र या दरांवर नियंत्रण आणल्याने नैसर्गिक वायूचे दर ६.५० वरून ६.७५ डॉलर प्रति एमएमबीटीयू वाढवला आहे. हे दर नियंत्रण एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ पर्यंत राहणार आहे. पुढील एप्रिल २०२६ मध्ये नैसर्गिक वायूच्या दरात ०.२५ डॉलर प्रति एमएमबीटीयूने वाढणार आहे.
नैसर्गिक वायूच्या हा मूळ दराने शहर गॅस वितरण कंपन्यांना वितरीत केला जातो. त्यातून या कंपन्या सीएनजी व पीएनजी तयार करतात. घरगुती वायू उत्पादनाचा ७० टक्के भाग हा एपीएम वायूतून येतो. शहरातील गॅस वितरण कंपन्या आपली ६० टक्के गॅसचे वितरण या एपीएम गॅसच्या माध्यमातून करतात. आता या कंपन्या आपल्या दरात वाढ करतील. त्यामुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.