शालेय विद्यार्थ्यांसाठी शासनाचा ‘हॅपी सॅटर्डे’ उपक्रम

 शालेय विद्यार्थ्यांसाठी शासनाचा ‘हॅपी सॅटर्डे’ उपक्रम

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुस्तकांच्या आणि वाढत्या अभ्यासक्रमाच्या ओझ्याखाली वाकलेल्या शालेय विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग विविध उपक्रम राबवण्यास प्राधान्य देतो. आठवडाभर गृहपाठ, प्रोजेक्ट्स, चाचणी परीक्षा यांच्या तणावात वावरणाऱ्या राज्यातील १ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी शनिवार हा आता आवडीचा वार ठरणार आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी अजूनही शनिवार म्हटले की सकाळी लवकर शाळा भरते. त्यामुळे विद्यार्थी काहीसे नाखुशीनेच शनिवारी शाळेत येतात. मात्र आता विद्यार्थी शनिवारी शाळेत येण्यास टंगळमंगळ करूच शकणार नाहीत कारण विद्यार्थ्यांसाठी शासन नवा उपक्रम आणणार आहे. ‘हॅपी सॅटर्डे’ असं या उपक्रमाचं नाव आहे.

या दिवशी विद्यार्थ्यांना शेती, क्रीडा, कला, तंत्रज्ञान, विज्ञान या विषयीच्या विविध उपक्रमांचे प्रात्यक्षिक शिकवण्यात येणार, मैदानात घेऊन जाण्यात येईल. विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी शासनाचा हा उपक्रम आहे. सध्या विद्यार्थी आणि तरुण मोबाईलमध्ये गुंतले आहेत. यामधून विद्यार्थ्यांना बाहेर काढत मैदानाकडे नेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या उपक्रमाची घोषणा होणार आहे. पुढील शालेय शिक्षण वर्षापासून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. हॅपी सॅटर्डे हा उपक्रम पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. या उपक्रमांतर्गत शनिवारच्या दिवशी मुलांनी वही, पुस्तक, दप्तर शाळेत आणायचे नाही. तर आता रविवार प्रमाणेच शनिवारही विद्यार्थ्यांच्या आवडीचा होणार आहे.

SL/ML/SL

24 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *