गोरेगाव (पश्चिम) परिसरातील १३ अनधिकृत दुकानांवर ‘पी दक्षिण’ विभागाकडून निष्कासनाची कारवाई
मुंबई, दि १०
गोरेगाव (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील ३ दुकानांचे तसेच ५डी रस्त्यावरील १० दुकानांच्या वाढीव बांधकामांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘पी दक्षिण’ विभागाकडून आज (दिनांक १० मार्च २०२६) निष्कासन करण्यात आले.
उपायुक्त (परिमंडळ-४) श्रीमती भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (पी दक्षिण विभाग) श्री. अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
गोरेगाव (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्ग आणि ५डी रस्त्यावर अनधिकृत बांधकामे उद्भवल्याने पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या ‘पी दक्षिण’ प्रशासकीय विभाग (वॉर्ड) अंतर्गत कार्यरत परिरक्षण, अतिक्रमण निर्मूलन व अनुज्ञापन या विभागाने संयुक्तरित्या मोहीम हाती घेतली. या कारवाईदरम्यान, स्वामी विवेकानंद मार्गावरील ३ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. तसेच, ५डी रस्त्यावरील १० दुकानांचे अनधिकृत वाढीव बांधकाम हटविण्यात आले. दरम्यान, परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
‘पी दक्षिण’ प्रशासकीय विभाग अंतर्गत कार्यरत परिरक्षण, अतिक्रमण निर्मूलन व अनुज्ञापन, विभागातील ५ अधिकारी आणि २५ कर्मचारी यांचा कारवाईच्या पथकात समावेश होता. १ जेसीबी, १ ट्रक, १ मालवाहू वाहन, गॅस कटर आदी संयंत्रांचा कारवाईसाठी वापर करण्यात आला. बांगुरनगर पोलीस ठाण्याकडून यावेळी पुरेसा बंदोबस्त तैनात होता.
दरम्यान, अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात नियमितपणे कारवाई सुरू राहील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.KK/ML/MS