Google Pay या सेवांसाठी आकारणार शुल्क

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील असंख्य लोकांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांचे मुख्य साधन झालेले आणि आजवर नि:शुल्क सेवा देणारा Google Pay आता वापरकर्त्यांवर काही सेवांसाठी शुल्क आकारणी करत आहे. देशातील सर्वात मोठ्या UPI प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या गुगल पे ने आता वीज आणि गॅस सारख्या युटिलिटी बिल पेमेंटवर सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी लहान रकमेच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क नव्हते. पण आता क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास जीएसटीसह ०.५ टक्के ते १ टक्के शुल्क आकारले जाईल. एक वर्षापूर्वी गुगल पे ने मोबाईल रिचार्जवर ३ रुपये सुविधा शुल्क आकारले होते. आता बिल पेमेंटवरही शुल्क आकारले जात आहे.
देशातील व्यवहारांमध्ये Google Pay चा वाटा मोठा आहे. सुमारे ३७ टक्के व्यवहार या द्वारे होतात. यूपीआय व्यवहारांमध्ये फोनपे पहिल्या क्रमांकावर आहे आणि गुगल पे दुसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारीपर्यंत गुगल पे ने ८.२६ लाख कोटी रुपयांचे यूपीआय व्यवहार केले होते.
SL/ML/SL
22 Feb. 2025