येत्या दोन वर्षात एस टी चा चेहरामोहरा बदलून टाकू

मुंबई दि ३ — येत्या दोन वर्षात, एसटीचा चेहरा मोहरा बदलणार असून, पुढील पाच वर्षात, २५ हजार बस खरेदी केल्या जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत दिली. अर्धा तास विशेष चर्चेद्वारे, आमदार अनिल परब यांनी एसटी महामंडळाच्या दूरवस्थेविषयीचा मुद्दा उपस्थित केला. त्याला उत्तर देताना सरनाईक यांनी, एस टी महामंडळाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी, श्वेत पत्रिका काढली असून, मंडळावर १० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे, मात्र सर्व सामन्यांसाठीच्या एस टीची स्थिती सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
बस प्रवाशांना, बस स्थानकांवर प्रसाधन गृह, स्वच्छता, उपहार गृह अशा किमान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, आधीच्या निविदा रद्द करत केवळ तीन वर्षासाठी, हॉटेल्स वा मोटेल्स च्या निविदा काढल्या जातील, अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. राज्यातल्या ८४० बस डेपोंच्या विकासाच्या दृष्टीने, शहरी भागातल्या डेपोचा विकास करताना तालुका आणि ग्रामीण स्तरावरचाही डेपोही विकसित होण्याच्या दृष्टीने समावेशक निविदा येत्या दोन महिन्यांत काढल्या जातील, असं सरनाईक यांनी सांगितलं. ML/ML/MS