‘गोंधळ’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाॅंच
मुंबई, दि. ३० : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारण्यात आलेल्या ‘गोंधळ’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच थाटात लाँच करण्यात आला. आपल्या मराठी संस्कृतीतील पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम या विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलीच चालना देतो आहे.
‘गोंधळ’ हा विधी नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजरा केला जातो आणि हाच पारंपरिक विधी आता रुपेरी पडद्यावर साकारण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये गूढता, नाट्यमयता आणि सांस्कृतिक रंग यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो. पारंपरिक वाद्यांचे नाद, मंत्रोच्चार, नृत्य आणि लोककलेचे सादरीकरण यामुळे ट्रेलर लाँच सोहळा एक सांस्कृतिक पर्वणी ठरला. उपस्थित प्रेक्षकांनी या सोहळ्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली.
चित्रपटाचे निर्माते डावखर फिल्म्स असून त्यांनी या विषयाला साजेसा भव्यतेचा स्पर्श दिला आहे. ट्रेलरमध्ये दाखवलेली दृश्ये आणि पार्श्वसंगीत प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. किशोर कदम यांच्यासह अनेक नामवंत कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. चित्रपट श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा अधोरेखित करतो, असे संकेत ट्रेलरमधून मिळतात.
हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नाही, तर संस्कृती, परंपरा आणि सामाजिक विचार यांचा वेध घेणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘गोंधळ’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्याचा ट्रेलर सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
SL/ML/SL