गोकुळच्या दुधाचे दर वाढले

गोकुळच्या दुधाचे दर सध्या वाढले आहेत. त्यानुसार गायीच्या दुधात प्रति लिटर दोन रूपये दरवाढ करण्याचा निर्णय दूध संघाने घेतला आहे. ही दरवाढ फक्त मुंबई, पुण्यासाठी असणार आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यात गोकुळचे गायीचे दूध प्रतिलिटर ५४ रूपये ऐवजी ५६ रूपयांनी मिळेल, अशी माहिती गोकुळ संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी दिली आहे.या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे,मात्र सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे. मुंबईत गोकुळ दुधाची तब्बल ३ लाख लिटर तर पुणे शहरात ४० हजार लिटर मागणी आहे. दूधाची दरवाढ मुंबई आणि पुण्यातच करण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रात ही दरवाढ करण्यात येणार नाही, असं गोकुळ दूध संघाकडून सांगण्यात आलं आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला मदर डेअरीकडून दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपये वाढ झाली. तर अमूलनेही प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर कर्नाटकातील नंदिनी संघानेही दर वाढवले होते. आता गोकुळने दुधाच्या दरात वाढ केली आहे.