गोदावरी नदी वाहू लागली दुथडी भरून, 27 दिवसांपूर्वी नदी पडली होती कोरडीठाक…

जालना दि ३:– जालन्याच्या अंबड – घनसावंगी तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. उन्हाळ्यात सुमारे 27 दिवसांपूर्वी ही नदी अक्षरशः कोरडीठाक पडली होती. यामुळे गोदाकाठच्या गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. गेल्या 15 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे ही कोरडी पडलेली गोदावरी नदी आता पुन्हा दुथडी भरून वाहत आहे. गोदावरी दुथडी भरून वाहतानाचे ड्रोन व्हिडिओ आता समोर आले आहेत.
आता ही नदी अवकाळी पावसामुळे गच्च भरून वाहू लागल्यानं नदीचं भरगच्च पात्र जलमय झालंय. अंबड तालुक्यातील शहागड परिसरातून वाहणाऱ्या या गोदावरी नदीचा खास नजराणा ड्रोन व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलाय. नदीचं पात्र जलमय झाल्याने पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नदीकाठच्या गावांना चांगलाच दिलासा मिळालाय. त्याचबरोबर या भागातील ऊस आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची देखील पाण्याची समस्या दूर झाली.