राजभवन येथे गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा

 राजभवन येथे गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा

मुंबई दि ३०– गोवा राज्याच्या मूळ लोकसंस्कृतीचे संगीत व लोककलेच्या माध्यमातून उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी गोवा राज्य स्थापना दिवस (३० मे) तसेच तेलंगणा राज्य स्थापना दिवस (२ जून) संयुक्तरित्या साजरा करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

प्रत्येकाने आपल्या राज्याचा, धर्माचा व आपल्या भाषेचा अभिमान अवश्य बाळगला पाहिजे परंतु सर्वाधिक अभिमान मातृभूमीचा बाळगला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
उभय राज्यांचे राज्य स्थापना दिवस हे भारत सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून साजरे करण्यात आले.

गोवा राज्य स्थापना दिनाचे आयोजन महाराष्ट्र राजभवनाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (स्वारातीम) यांच्या सहकार्याने केले होते, तर तेलंगणा राज्य स्थापना दिनाचे आयोजन मुंबई आंध्र महासभा व जिमखाना या संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले.

गोवा म्हटले की लोकांना पाश्चात्य संस्कृती आठवते. परंतु स्वारातीमच्या विद्यार्थ्यांनी गोव्याचे ढालो नृत्य व दिवली नृत्य सादर करून तेथील मूळ भारतीय संस्कृतीची आठवण करून दिली. हे सादरीकरण अपूर्व होते या शब्दात राज्यपालांनी स्वारातीमच्या विद्यार्थ्यांना तसेच सांस्कृतिक चमूला कौतुकाची थाप दिली.
प्रसिद्ध कुचिपुडी नृत्यांगना नादिया हिने ‘नटराज नाट्यहेला’ शास्त्रीय नृत्य सादर करून मंत्रमुग्ध केले या शब्दात राज्यपालांनी तिचे कौतुक केले.

युरोप मधील देशांमध्ये भाषिक विविधता आहे. तेथील देशांनी सामायिक हितासाठी युरोपिअन युनिअन तयार केली. भारतात अनेक राज्ये व अनेक भाषा आहे. या सर्व राज्यांमधील सांस्कृतिक एकता हे आपले बलस्थान आहे. या एकतेमुळेच भारताचे आज जगात महत्व आहे, असे सांगून जगाशी स्पर्धा करण्यासाठी ही एकता टिकवली पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

सन २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल. मात्र जगावर राज्य न गाजवता भारत आपल्या शक्तीचा वापर मानवतेची सेवा करण्यास करील असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते स्वारातीमचे कुलगुरु डॉ मनोहर चासकर यांचा तसेच मुंबई आंध्र महासभेचे अध्यक्ष एम कोंडा रेड्डी यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक केले तर कक्ष अधिकारी जयेश ठाकूर यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी मुंबईतील तेलंगणाच्या महिलांनी तेलंगणाचे बथकम्मा नृत्य सादर केले. या कार्यक्रमात दोन्ही राज्यांचा इतिहास आणि वारसा दर्शविणारे लघुपट देखील दाखवण्यात आले.

स्वारातीमचे प्रकुलगुरु डॉ अशोक महाजन, मुंबई आंध्र महासभा आणि जिमखान्याचे सरचिटणीस यापुरम वेकटेश्वर, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, स्वारातीम विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व विद्यार्थी आणि मुंबईत राहणारे मूळचे तेलंगणा राज्याचे गणमान्य नागरिक उपस्थित होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *