घोड्यांना ग्लँडर्स रोगाचा प्रादुर्भाव, प्रतिबंधात्मक अंमलबजावणी सुरू

लातूर दि १४:– लातूर जिल्ह्यात घोड्यांमध्ये ग्लँडर्स या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळला असून, सध्या जिल्ह्यात एक घोडा ग्लँडर्स पॉझिटिव्ह आढळला आहे. तर, चार घोडे ग्लँडर्स सदृश्य आजाराने संशयित आहेत. दरम्यान, ग्लँडर्स आणि फारसी कायदा १८९९, राष्ट्रीय अश्व कृती योजना २०१९ आणि प्राण्यांतील संसर्गजन्य आणि संक्रामक रोग अधिनियम २००९ यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार बाधित घोड्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने दयामरण देण्यात आले.
या रोगात माणसांमध्येही पसरण्याची शक्यता असणाऱ्या झूनॉटिक रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. या रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पाच किलोमीटर परिसरातील सर्व घोड्यांचे नमुने घेण्यास सुरुवात करण्यात आली असून, हे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळा आणि हरियाणामधील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र (हिसार) येथे तपासणीसाठी पाठवले जात आहेत. त्यामुळे हा रोग किती पसरला आहे, हे अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी दिली.
दरम्यान, आत्तापर्यंत २१ घोड्यांचे नमुने पुणे आणि हरियाणातील हिसार येथे पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस पशुसंवर्धन, आरोग्य, पोलीस, महानगरपालिका विभागांचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील घोडामालक आणि पालक उपस्थित होते.
ग्लँडर्स रोगाबाबत पशुसंवर्धन, आरोग्य, पोलीस आणि महानगरपालिका विभागांनी योग्य ती दक्षता घ्यावी. पशुसंवर्धन विभागाने नमुने संकलन करून प्रयोगशाळेत वेळेत पाठवावेत. आरोग्य विभागाने मानवांमध्ये होणाऱ्या लक्षणांसाठी विशेष तपासणी मोहीम राबवावी. महापालिका आणि ग्रामपंचायतींनी परिसरात स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि माहिती प्रसाराचे कार्य हाती घ्यावे. पोलिस प्रशासनाने घोड्यांची वाहतूक थांबवण्यासाठी उपाय करावेत. घोडामालक आणि पालकांनी घोड्यांच्या नाकातून पू येणे, फोड, ताप, अशक्तपणा अशी लक्षणे दिसल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी त्वरित संपर्क साधावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने या बैठकीत दिल्या.