कुस्तीपट्टूंना न्याय द्या, राज ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क): रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत. २८ तारखेला सरकारने कुस्तीपट्टूंना धरपकड करत त्यांना अटक केली होती. त्यानंतर काल कुस्तीपट्टू पदके गंगार्पण करण्यास निघाले होते. दरम्यान या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. तसेच ब्रिजभूषण यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी लिहिलं आहे की, “आज तुमचं (नरेंद्र मोदी) एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर, लक्ष वेधून घेणं हे तेंव्हा म्हणता येईल जेव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर. पण आपणास हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता ‘प्रधानसेवक’ ह्या नात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती.”
“ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत,” असे राज ठाकरे म्हणाले
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, आणि ह्या लढाईत कोणाच्याही ‘बाहुबला’चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे.
ह्या आधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली तेंव्हा असो की मुंबईतील २६/११ च्या घटनेच्या वेळेस धाव घेतली होतीत. ही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवास्थानापासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच इच्छा / विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे, असे राज ठाकरे यांना पंतप्रधानांना लिहिलं आहे.
SL/KA/SL
31 May 2023